SCO Summit India: भारत (India) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. यंदा या परिषदेचं (SCO Summit) आयोजन वर्च्युअली (Virtually) केलं जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानं (MEA) मंगळवारी (30 मे) यासंदर्भात माहिती दिली. मात्र, व्हर्च्युअल पद्धतीनं शिखर परिषद आयोजित करण्याचं कारण अद्याप सांगण्यात आलेलं नाही. गेल्या वर्षी SCO शिखर परिषद समरकंद, उझबेकिस्तान (Uzbekistan) येथे झाली होती. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping), रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यासह जगभरातील सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते. 


गेल्या वर्षी 16 सप्टेंबर रोजी समरकंद शिखर परिषदेत भारतानं SCO चं अध्यक्षपद स्वीकारलं होतं. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की, भारताच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच, SCO परिषदेच्या राष्ट्राध्यक्षांची 22वी शिखर परिषद 4 जुलै रोजी व्हर्च्युअल मोडमध्ये आयोजित केली जाईल, ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. या महिन्याच्या सुरुवातीला गोव्यात दोन दिवसीय परिषदेसाठी भारतानं SCO च्या परराष्ट्र मंत्र्यांचं स्वागत केलं होतं.


कोणत्या देशांना आमंत्रण? 


परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, SCO चे सर्व सदस्य देश - चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांना या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय इराण, बेलारूस आणि मंगोलिया यांना पर्यवेक्षक देश म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. SCO परंपरेनुसार, तुर्कमेनिस्तानलाही अध्यक्षपदाचे पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे.


परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या परिषदेसाठी सहा आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांच्या प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्रे, ASEAN (असोसिएशन ऑफ आग्नेय आशियाई राष्ट्रे), CIS (स्वतंत्र राज्यांचे राष्ट्रकुल), CSTO, EAEU (युरेशियन इकॉनॉमिक युनियन) आणि CICA या संघटना सहभागी होणार आहेत. 


यंदा SCO शिखर परिषदेची थीम काय?


शिखर परिषदेची थीम 'एका सिक्योर (SECURE) एससीओ च्या दिशेनं' आहे. म्हणजे सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि व्यापार, कनेक्टिव्हिटी, एकता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी सन्मान आणि पर्यावरणाशी संबंधित असणार आहे. SCO ची स्थापना 2001 मध्ये रशिया, चीन, किर्गिझ प्रजासत्ताक, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या अध्यक्षांनी शांघाय येथे झालेल्या शिखर परिषदेत केली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


India-UK Relation: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा ब्रिटनच्या मंत्र्यांना सल्ला; म्हणाले, 'लोकशाही स्वातंत्र्य...'