चंदीगड : भारतासाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. एकिकडे अंतराळ विज्ञान क्षेत्रात मोठ्या भरारीचा दिवस असताना दुसरीकडे भारतीय संस्कृतीच्या प्राचीनतेबद्दल आणि भारतीयांच्या भारतीय मुळाबद्दल एक मोठं संशोधन जगासमोर आलं आहे. प्राचीन भारतीय संस्कृती रुजवणारे आर्य हे भारतीयच असून ते भारताबाहेरून आलेले नव्हते, असे संशोधनाअंती सिद्ध करण्यात संशोधकांना यश मिळालं आहे.

डेक्कन कॉलेज, हार्वर्ड मेडिकल स्कूल, बिरबल सहानी इन्स्टिट्यूट, सीसीएमबी, कॅलिफोर्निया विद्यापीठ अशा जगभरातील 13 प्रख्यात संशोधन संस्थांनी आर्य आणि भारतीयांबद्दलचं संशोधन पूर्ण केले आहे.

28 शास्त्रज्ञांनी तीन वर्षे अथक प्रयत्न करुन हरियाणातील राखीगडी इथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांमधून यशस्वीरित्या डीएनए मिळवला. तेव्हाच्या माणसांच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करून जगभरातील हे सर्व शास्त्रज्ञ या निष्कर्षावर आले आहेत की "भारतात कोणीही बाहेरून आलेले नाही. तर भारतातील लोक अगदी प्राचीन काळापासून इथेच राहत असून, सिंधू संस्कृतीतील माणसे आपलेच पूर्वज आहेत.

या संशोधनामुळे आर्य कुठून तरी बाहेरुन आले होते, हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास मोडीत निघाला आहे. या संशोधनाद्वारे संशोधकांनी भारतीय संस्कृतीच्या प्राचिनत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.

आर्यांबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. आर्यांनी भारतावर आक्रमणं केल्याचा जुना सिद्धांत अनेक जण खरा मानतात. परंतु शेकडो वर्षांपासून आपल्या भारतीय संस्कृतीशी जोडला गेलेला आर्य आक्रमणाचा हा सिद्धांत आजच्या संशोधनामुळे मोडीत निघाला आहे.