नवी दिल्ली : पुढील वर्षांपासून शालेय अभ्यासक्रम निम्म्यावर आणण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा बोजा कमी करण्याच्या हेतूनं NCERT नं हा निर्णय घेतला आहे.


सध्याचे शालेय अभ्यासक्रम हे कला आणि वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.

यावेळी प्रकाश जावडेकर यांनी शिक्षकांच्या गुणवत्तेवरही शंका उपस्थित केली. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या जमेच्या बाजू आणि कमकुवत गोष्टी शिक्षकांनी समजून घ्यायला हव्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना पुढील तयारीस मदत करायला हवी.”

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन कायमच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. त्यामुळे येत्या वर्षापासून शालेय अभ्यासक्रम निम्मा होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासादायक ठरणार आहे.