रतलाम (मध्य प्रदेश) : युनिफॉर्मवरुन शिक्षक रागावल्याने संतापलेल्या विद्यार्थ्याने शाळेच्या संचालकावरच गोळीबार केला. मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यातील या घटनेने राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
घटना काय आहे?
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात माईल स्टोन नावाची शाळा आहे. या शाळेतील एक विद्यार्थी शनिवारी शाळेच्या यूनिफॉर्ममध्ये आला नाही. त्यामुळे त्याला घरी जाऊन यूनिफॉर्म परिधान करुन येण्यास सांगितले गेले. शिवाय, त्या विद्यार्थ्याच्या घरी फोन करुन त्याच्या नियमभंगाबाबत शाळेकडून तक्रार करण्यात आली व दोन दिवस विद्यार्थी शाळेत न आल्याबाबत पालकांना जाब विचारण्यात आला. या सर्व गोष्टींचा राग मनात ठेवून विद्यार्थ्याने शाळेचे संचालक अमित जैन यांच्यावर गोळीबार केला. यात अमित जैन जखमी झाले आहेत.
सीएसपी दीपक शुक्ला यांच्या माहितीनुसार, विद्यार्थ्याच्या गैरहजेरीचा ज्यावेळी घरी फोन आला, त्याचवेळी तो विद्यार्थी शाळेत निघण्यासाठी तयार होत होता. त्याला हा सर्व प्रकार कळल्यानंतर त्याने शाळेत जाताना बंदूकही सोबत घेतली. शाळेत पोहोचल्यानंतर संचालकांच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्या पोटावर गोळीबार केला.
या सर्व प्रकारानंतर आरोपी विद्यार्थी फरार आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल करुन, तपास सुरु केला आहे. दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या संचालकांवर इंदौरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.