आग्रा : आपल्या पाल्याला नापास का केलं, याचं कारण विचारणं एका पित्याला चांगलंच महागात पडलं आहे. आग्य्रातील एका शाळेने संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांवर एक कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

 
विद्यार्थ्याच्या पालकाने संयुक्त शिक्षण संचालकांकडे यांसदर्भात तक्रार केली. त्यामुळे या प्रतिष्ठित शाळेने पालकांवर एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. त्याचप्रमाणे मुलाला शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे पीडित पित्याने डीएमकडे न्यायाची दाद
मागत रस्त्यावर भीक मागण्याचा निर्णय घेतला आहे.

 
सेंट फ्रान्सिस या शाळेत हाजी सगीर अहमद यांचा मुलगा शहजान आठव्या इयत्तेत शिकतो. नापास झाल्याने पित्याने मुलाला प्रमोट करण्याची मागणी शाळेकडे केली. अनेकदा शाळेच्या पायऱ्या झिजवूनही दाद मिळाली नसल्याचं हाजी सगीर म्हणाले.

 

आठवीपर्यंत नापास न करण्याच्या नियमाचा उल्लेख करत सगीर यांनी शाळा प्रशासनाला नोटीस पाठवली. त्याचप्रमाणे मानव विकास मंत्रालयालाही पत्र पाठवलं. यावर शाळेने नोटीशीला उत्तर दिलं नाही, मात्र 6 तारखेला सगीर यांना 1 कोटी रुपये पाठवण्यासंबंधी नोटीस बजावली.