मुंबई : पश्चिम बंगालमधल्या एका शाळेने देणगीअभावी पायाभूत सुविधा सुधारण्याच्या आशा सोडून दिल्या होत्या. मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 76 लाखांच्या निधीमुळे शाळा प्रशासन कृतकृत्य झाली आहे.

 
पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूरमधील स्वर्णमयी सस्मल शिक्षा निकेतन शाळेत पायाभूत सुविधाच नसल्याने शिक्षक, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थीही त्रस्त होते. त्यामुळे शाळेच्या कर्मचाऱ्यांनी थेट खासदार सचिन तेंडुलकरकडे मदतीची याचना केली. तेव्हा शाळेच्या पत्राला उत्तरादाखल सचिनने 76 लाखांचा निधी मंजूर केला. यानंतर शाळेच्या लायब्ररी, लॅब आणि गर्ल्स कॉमन रुमचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं आहे.

 
शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी तेंडुलकरचे प्रचंड मोठे चाहते आहेत. त्यामुळेच आपल्या लाडक्या क्रिकेटपटूकडे त्यांनी हक्काने मदतीची मागणी केली. मात्र त्याच्याकडून आलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर सगळेच निशब्द झाले आहेत. एमपीएलएडी (संसद सदस्य स्थानिक परिसर विकास) योजने अंतर्गत सचिनने हा निधी मंजूर करुन घेतला.

 
संसदेत सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीची चर्चा अनेक वेळा होते. गेल्या वर्षी झालेल्या एका सर्व्हेनुसार तेंडुलकरची उपस्थिती 6 टक्क्यांहून कमी आहे, तर सचिनने एकदाही सदनात प्रश्न विचारण्यासाठी तोंड उघडलेलं नाही. 2012 मध्ये सचिनची राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्ती झाली होती.