भदोही : उत्तर प्रदेशातल्या भदोहीमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेनच्या धडकेत स्कूलबसमधील नऊ चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता. मात्र या अपघाताला स्कूलबस चालकाची स्टंटबाजीच कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे.


 
स्कूलबस अपघातातून वाचलेल्या विद्यार्थ्यांनी ड्रायव्हरबाबत ही माहिती दिली आहे. रेल्वे ट्रॅकवरुन येणाऱ्या ट्रेनसमोरुन अधिक वेगाने स्कूल बस नेण्याचीही त्याला खोड होती. त्याचप्रमाणे गाडी चालवताना इअरफोन लावून गाणी ऐकण्याची सवय ड्रायव्हरला असल्याचंही सांगितलं जातं. मात्र त्याच्या या सवयी विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतल्या आहेत.

 
भदोही जिल्ह्यातल्या औरईमधील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर सोमवारी ट्रेनच्या धडकेत स्कूल बसमधील 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर 19 जण जखमी आहेत.

 

रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेनची स्कूल बसला धडक, नऊ चिमुरड्यांचा मृत्यू


 

रेल्वे क्रॉसिंगवर अनेक गाड्या उभ्या होत्या, मात्र टाटा मॅजिकच्या ड्रायव्हरने आगाऊपणे गाडी पुढे दामटवली. तिथे उपस्थित असलेल्यांनी चालकाला थांबवण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्याने न जुमानता मुलांचं आयुष्य पणाला लावलं.

 
ट्रेन जवळ येताच त्याने दार उघडून बाहेर पडण्याचाही प्रयत्न केला, मात्र ट्रेनने त्याला उडवलंच. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.