SBI डेबिट कार्ड धारकांनी 2018 मध्येच 'हे' करावं
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2018 07:59 AM (IST)
एसबीआयचं जुनं मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड लवकरच बंद होणार असून ग्राहकांना ते बदलून घेण्याचे निर्देश बँकेने दिले आहेत.
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात 'एसबीआय'च्या डेबिटकार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. एसबीआयचं जुनं मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड लवकरच बंद होणार असून ग्राहकांना ते बदलून घेण्याचे निर्देश बँकेने दिले आहेत. 'एसबीआय'ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार 2018 वर्ष संपण्यापूर्वी मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड बदलून ईएमव्ही चिप डेबिट कार्ड घेण्याचं आवाहन ग्राहकांना करण्यात आलं आहे. मुदतीपूर्वी आपलं जुनं मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड बदलून घेतलं नाही, तर ग्राहकांना त्यांचे एटीएम व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे 31 डिसेंबर 2018 पूर्वीच एसबीआय एटीएम कार्डधारकांना अपडेटेड कार्ड घ्यावं लागेल. एसबीआयकडून कन्व्हर्जन प्रोसेस करण्यात येत असून त्यासाठी ग्राहकाला एक रुपयाही मोजावा लागणार नाही. ही प्रकिया पूर्णपणे सुरक्षित असल्याची हमीसुद्धा एसबीआयने दिली आहे.