नवी दिल्ली: एक-दोन नव्हे तर तब्बल 500 पेक्षा जास्त लक्झरी कार चोरणारा महाठग दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. या चोरट्यावर पोलिसांनी तब्बल 1 लाख रुपयाचं इनाम जाहीर केलं होतं.


सफरुद्दीन असं या 29 वर्षीय चोराचं नाव आहे. तो दिल्लीतीलच रहिवासी आहे. महत्त्वाचं म्हणजे सफरुद्दीन आणि त्याची गँग विमानाने दिल्लीत येऊन कार चोरायचे आणि परत हैदराबादला पळून जायचे. त्यामुळे पोलिसांना ते सापडतच नव्हते.

गगन सिनेमा परिसरात पोलिसांनी एक कार रोखली होती. त्या गाडीत सफरुद्दीन होता. पोलिसांनी गाडी रोखण्यास सांगितलं असता, त्याने सुसाट गाडी पळवली. जवळपास 50 किमी पाठलाग करुन, पोलिसांनी सफरुद्दीनला बेड्या ठोकल्या.

100 कार चोरीचं टार्गेट

सफरुद्दीनने पोलिसांनी दिलेली माहिती खूपच धक्कादायक होती. त्याने वर्षभरात दिल्लीत 100 कार चोरण्याचं टार्गेट ठेवलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं. त्यासाठी तो हवाईमार्गे हायटेक गॅझेटसह आला होता. निवडक गाडया चोरण्याचा त्याचा हेतू होता.

दरम्यान, या टोळीने पोलिसांवर गोळीबारही केला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत सफरुद्दीनचा साथीदार नूर मोहम्मद ठार झाला होता. तर रवी कुलदीप या साथीदाराला अटक झाली होती.

चोरलेल्या गाड्यांची विक्री

चोरटे दिल्लीतून गाड्या चोरुन, त्या कार पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात त्यांच्या ओळखीच्या लोकांना विकत असत.