नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) होम लोनवरील व्याजदर 0.1 टक्के ते 0.25 टक्क्यांनी स्वस्त केले आहे. त्यामुळे होम लोनवरील व्याज दर आता 8.60 टक्क्यांवरुन 8.35 टक्के झाले आहे.


आताच्या घडीला इतर सर्व बँकांच्या तुलनेत एसबीआयचं होम लोन सर्वात स्वस्त झाले आहे. त्यामुळे एसबीआयच्या ग्राहकांच्या लोनवरील ईएमआय स्वस्त होईल आणि ग्राहकांची दर महिन्याला बचतही वाढेल.

एसबीआयची होम लोनवरील नवी कपात 9 मे 2017 पासून लागू होईल. होम लोनवरील व्याज दरातील कपातीमुळे अफोर्डेबल हाऊसिंगला प्रोत्साहन मिळेल आणि अधिकाधिक ग्राहकांचं एसबीआय होम लोनच्या माध्यमातून नव्या घराचं स्वप्नही पूर्ण होईल.

SBI होम लोनचे नवे व्याज दर :

  • महिलांसाठी – 30 लाखांपर्यंतच्या होम लोनवर आता 8.35 टक्के व्याज दर

  • पुरुषांसाठी – 33 लाखांपर्यंतच्या होम लोनवर आता 8.4 टक्के व्याज दर

  • पुरुषांसाठी – 30 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या होम लोनवर आता 8.5 टक्के व्याज दर


याचसोबत जे ग्राहक पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र असतील, त्यांना या योजनेनुसार 2.67 लाख रुपयांचं व्याज अनुदानही मिळणार आहे.

आपल्या ग्राहकांसाठी होम लोन स्वस्त करणारी स्टेट बँक ऑफ इंडिया आगामी काळात बिल्डर्सना अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट्सना प्रोत्साहन देण्यासाठी कंस्ट्रक्शन फायनान्ससाठी स्पेशल ऑफरही देणार आहे.

गेल्याच महिन्यात एसबीआयने बेस रेट 9.25 टक्क्यांवरुन 9.10 टक्के केले होते. यंदाच एसबीआयने लेंडिंग रेटमध्येही (MCLR) कपात केली होती.

देशातील सर्वात मोठी होम लोन प्रोव्हायडर संस्था म्हणून एसबीआयकडे पाहिले जाते. त्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंगला चालना देण्यासाठी एसबीआय होम लोनवरील व्याज दर कपात महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.