नवी दिल्ली : वाढत्या इंधनदरांमुळे त्रस्त झालेल्या स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे. एसबीआयच्या ग्राहकांना पाच लिटरपर्यंत मोफत पेट्रोल मिळवण्याची संधी आहे. इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना भाग्यशाली ग्राहकांना मोफत पेट्रोल मिळू शकतं.

भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (एसबीआय) ने ग्राहकांसाठी नवी योजना सुरु केली आहे. एसबीआयचे ग्राहक असलेले वाहनचालक भीम एसबीआय पे अॅपच्या माध्यमातून पेमेंट करुन इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पाच लिटरपर्यंत मोफत पेट्रोल भरण्याची संधी मिळवू शकतात.

ही ऑफर शुक्रवार 23 नोव्हेंबर 2018 पर्यंतच लागू असून दररोज पहिल्या दहा हजार ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यासह महाराष्ट्रभरातील अनेक जिल्ह्यात पेट्रोलने नव्वदी पार केली होती. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने दिलासा देत दर काही रुपयांनी कमी केले. सध्या 80 ते 82 रुपयांच्या दरम्यान पेट्रोलच्या किमती वर-खाली होत आहेत.

एसबीआय ग्राहक ही ऑफर कशी मिळवू शकतात?

1. इंडियन ऑईलच्या कोणत्याही पेट्रोलपंपावर जा. तुमच्या स्मार्टफोनमधील भीम एसबीआय पे अॅपच्या माध्यमातून पेमेंट करा. किमान शंभर रुपयांच्या वर ट्रांझॅक्शन करणाऱ्यांसाठी ही ऑफर लागू आहे.

2. <UPI रेफरन्स क्रमांक (12 अंकी)> <DDMM> अशा स्वरुपात 9222222084 या क्रमांकावर एसएमएस पाठवा. DDMM म्हणजे पेमेंट केलेल्या ट्रांझॅक्शनचा दिवस (तारीख-वर्ष) या स्वरुपात

3. भाग्यवान ग्राहक पाच लिटरपर्यंत मोफत पेट्रोल भरण्यास पात्र ठरतील. पुढील प्रक्रियेसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात येईल.

एसबीआयने ही ऑफर जारी करताना नियम आणि अटी लागू केल्या आहेत. ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी अटी वाचण्याचं आवाहन बँकेतर्फे करण्यात येत आहे.

निवडक अटी :

1. ही ऑफर भारतात राहणाऱ्या 18 वर्षांवरील सर्व भारतीय नागरिकांसाठी लागू आहे.

2. केवळ इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि आसाम ऑईल डिव्हिजन रिटेल आऊटवर इंधन भरण्यासाठीच ऑफर लागू

3. एखादा मोबाईल क्रमांक ऑफर कालावधीत कॅशबॅक मिळवण्यासाठी केवळ दोन वेळाच पात्र ठरेल. जास्तीत जास्त 400 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल (या किमतीत गोव्यात पाच लिटर पेट्रोल मिळते)

4. इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर सात दिवसांच्या आत एसबीआयने जारी केलेल्या पद्धतीनुसार एसएमएस करणारे ग्राहकच ऑफर मिळवण्यासाठी पात्र ठरतील.

(या ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी एसबीआयची वेबसाईट ग्राहकांनी तपासून पाहावी. 'एबीपी माझा' त्यासंबंधी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही)