पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या दीर्घकालीन आजारपणाचे पडसाद गोव्याच्या राजकरणासोबत समाजकारणावर उमटू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळेच उद्या पर्रिकर यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थावर सामाजिक कार्यकर्ते, निमसरकारी संस्था आणि काँग्रेससह अन्य काही पक्षाचे पदाधिकारी मिळून मोर्चा काढणार आहेत.
पर्रिकर आजारी असूनही त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वतःकडे ठेवली असल्याचा परिणाम प्रशासनावर होऊ लागला असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विरोधी पक्षांपाठोपाठ घटक पक्ष, मंत्री आणि आमदारही त्यांची नाराजी व्यक्त करु लागले आहेत.
गोव्यातली प्रशासन व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी पर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा अन्य एखाद्या मंत्र्याकडे सोपवावा, अशी मागणी करत आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी पणजी येथील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. स्वातंत्र्य सैनिक दाद देसाई, भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे नेते व निवृत्त आयएएस अधिकारी अरविंद भाटीकर, हायकोर्टाचे वकील आयरिश रॉड्रीग्ज, माजी मुख्यमंत्री रवी नाईक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, अमरनाथ पणजीकर, सामाजिक कार्यकर्ते सॉटर डिसोझा, अॅड. यतिश नायक, डॉ. प्रमोद साळगावकर, पणजीचे माजी महापौर यतिन पारेख, प्रसाद आमोणकर आदीनी आज घाटे यांची भेट घेतली.
आयरिश रॉड्रीग्ज म्हणाले की, "उद्याच्या मोर्चात आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी पुढे आलो आहोत. आम्ही शांतपणे मोर्चा नेऊ व पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्या आरोग्याची सद्यस्थिती काय आहे ते जाणून घेऊ"
गिरीश चोडणकर म्हणाले की, "खनिज खाणप्रश्नी भाजपाने गोमंतकीयांना फसवले असल्याचे कायदा मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर नव्याने उघड झाले आहे. तसेच एमएमडीआर कायदा दुरुस्त करता येणार नाही, अशा प्रकारचा सल्ला केंद्रीय कायदा मंत्रालयाने दिल्याचे दैनिकांनी समोर आणले आहे".
मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा पर्रिकरांच्या निवासस्थानावर मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Nov 2018 08:06 PM (IST)
मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी सर्व विरोधक उद्या पर्रिकरांच्या घरावर मोर्चा नेणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -