मुंबई : "एसबीआयच्या मोबाईल वॉलेटमधून पैसे काढल्यास 25 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सेव्हिंग बँकमधील पैसे एटीएममधून काढल्यास आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही", असं स्पष्टीकरण स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने दिले आहे.


एक जूनपासून एसबीआयच्या एटीएम व्यवहारावर 25 रुपये अधिकचे शुल्क आकारले जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. एसबीआयकडून या अफवांचं खंडण करण्यात आले आहे.

सेव्हिंग अकाऊंटशी संबंधित एटीएम व्यवहारावरील सेवा शुल्कात कोणतेही बदल केलेले नाहीत, अशी माहिती एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक (नॅशनल बँकिंग) रजनीश कुमार यांनी दिली.

“जर ‘एसबीआय बडी’ या मोबाईल वॉलेटमध्ये पैसे असतील, तर ते पैसे एटीएमच्या माध्यमातूनही एसबीआयचे ग्राहक काढू शकतील. शिवाय, बिझनेस करस्पाँडन्टच्या (BC) माध्यमातून ग्राहक पैसे भरु आणि काढूही शकतात. या सुविधा आधी मिळत नव्हत्या.”, असेही रजीनश कुमार यांनी सांगितले.

त्याचबरोबर, एसबीआयच्या मोफत एटीएम व्यावहारांची संख्याही बदललेली नाही, असेही एसबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एसबीआयमधील जन-धन खातेदारांना चार मोफत एटीएम व्यवहार करता येतील.