नवी दिल्ली : भाजपच्या संघटनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. सतीश वेलणकर या मराठमोळ्या चेहऱ्याची भाजपचे नवे संघटन महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रामलाल यांच्या जागी सतीश वेलणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामलाल यांनी स्वत: आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती अमित शाहांना केली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


रामलाल परत संघामध्ये पूर्णवेळ काम करणार आहेत. रामलाल यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आरएसएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलाल भाजपमध्ये संघटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते.


मात्र आता रामलाल यांच्याजागी सतीश वेलणकर यांना भाजप संघटन महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सतील वेलणकर सध्या भाजपमध्ये राष्ट्रीय संयुक्त महासचिव पदी आहेत.


रामलाल भाजपमध्ये प्रमुख रणनितीकार म्हणून संघ आणि पक्षातील दुवा होते. भाजपच्या महत्वाच्या बैठकांमध्ये ते उपस्थित असत. ही जबाबदारी आता वेलणकर यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय गोपाल आर्य यांना पर्यावरण कार्यक्रमांचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.


रामलाल यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहून आपल्याला संघटन महामंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली होती. गेली 13 वर्ष आरएसएसमधील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या संघटन महामंत्रिपदाची जबाबदारी ते सांभाळत होते. वाढत्या वयामुळे आता या पदावर नवीन लोकांना संधी देण्यात यावी यासाठी रामलाल आग्रही होते.