कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत, तर त्यांना तुरुंगात धाडेन अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आव्हान दिलं आहे. ईश्वरचंद विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचा आरोप भाजपने केला होता. लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात मोदी आणि दीदी यांच्यातील राजकीय द्वंद्व शिगेला पोहचलं आहे.

पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारादरम्यान ईश्वरचंद विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड झाल्यावरुन जोरदार राजकारण रंगलं आहे. नरेंद्र मोदींनी ईश्वरचंद विद्यासागर यांचा पुतळा होता त्याच ठिकाणी बांधून देण्याचं आश्वासन उत्तर प्रदेशातील रॅलीमध्ये दिलं होतं. त्यानंतर
'बंगालने भाजपकडून पैसे कशाला घ्यावे? आमच्याकडे पुष्कळ स्रोत आहेत. भाजपने पश्चिम बंगालच्या दोनशे वर्षांच्या वारशाला धक्का पोहचवला, त्याचं काय?' असा घणाघात ममता यांनी केला.

'भाजपला मूर्तीभंजनाची सवयच आहे. त्यांनी त्रिपुरातही असाच प्रकार केला होता. पश्चिम बंगालमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली' असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. भाजपला पाठिंबा देणाऱ्यांना समाज स्वीकारणार नाही, असंही त्या म्हणाल्या. मोदींनी ममता बॅनर्जी या सत्तापिपासू असल्याचा आरोप केला.

ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा भाजपने नाही, तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तोडल्याचा दावा अमित शाह यांनी केला होता. हिंसा झाली त्यावेळी विद्यासागर कॉलेजचं गेट बंद होतं, मग ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड कुणी केली? कॉलेजच्या आत कोण गेलं? कारण त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर होते, असं अमित शाहांनी सांगितलं.

VIDEO | कोलकात्यात ममता बॅनर्जींची पदयात्रा | एबीपी माझा



अमित शाह यांच्या रोड शोमधील राड्यानंतर निवडणूक आयोगाने प्रचाराचा अवधी एक दिवसाने कमी केला. त्यानंतर ममता बॅनर्जींसह सर्वच विरोधी पक्षांनी मोदींना लक्ष्य करत टीकेची तोफ डागली. पत्नीला सांभाळता येत नाही, तर देश काय सांभाळणार अशा शब्दात ममता बॅनर्जी आणि बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काल मोदींवर वैयक्तिक टीका केली होती.

कोलकातामध्ये तुफान राडा

भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शोमध्ये काल (मंगळवार 14 मे) तुफान राडा झाला होता. तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषद आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्यामुळे काही काळासाठी वातावरण तंग झालं होतं. कोलकात्यातील धर्मतल्ला भागातील शहीद मिनार मैदानातून अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात झाली. मेडिकल कॉलेजजवळ हा रोड शो आल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी 'गो बॅक'चा नारा दिल्याने भाजप कार्यकर्ते चिथावले. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकही झाली. यानंतर रोड शो आवरता घेत अमित शाह यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी लाठीचार्ज करुन कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवलं.

भाजपच्या रोड शो दरम्यान तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तीन वेळा हल्ला केला, भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला. 'तृणमूलला पराभव समोर दिसत असल्याने भाजपाला रोखण्यासाठी हिंसेचा वापर होत आहे. मात्र भाजप संपूर्ण देशभरात 300 पेक्षा अधिक जागा जिंकणार आहे. 23 मे रोजी ममता बॅनर्जी यांचे दिवस संपणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप 23 पेक्षा अधिक जागा जिंकणार' असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या