'नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला दहशतवादी म्हणवणाऱ्यांनी आधी अंतरंगात डोकावून पाहावं. अशा लोकांना निवडणुकीत योग्य उत्तर मिळेल', असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंहने केलं.
मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्याला प्रज्ञाने प्रत्युत्तर दिलं. गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. त्यानंतरच देशात दहशतवादाची सुरुवात झाल्याचं हासन म्हणाले होते.
VIDEO | नथुराम गोडसे देशभक्त होते आणि राहतील, साध्वी प्रज्ञांचं वक्तव्य
भाजपकडून वक्तव्याचा निषेध
दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंहच्या वक्तव्याशी आपण असहमत असल्याचं भाजप नेते जीवीएल नरसिंहा राव यांनी स्पष्ट केलं आहे. 'साध्वी प्रज्ञासिंहच्या वक्तव्याचा भाजप निषेध करतं. पक्ष त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवेल. त्यांनी या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी.' असंही राव म्हणाले.
साध्वीचा माफीनामा
सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर नथुराम गोडसे देशभक्त असल्याच्या वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहने माफीनामा मागितला. 'ते माझं वैयक्तिक मत होतं. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र कोणाचं मन दुखावलं असल्यास माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं, ते विसरता येण्यासारखं नाही. माध्यमांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास' अशी पुष्टी तिने जोडली.
हेमंत करकरेंबद्दलचं वक्तव्य काय?
'हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला.' या साध्वीच्या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी साध्वीला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. 'माझ्या वक्तव्याचा देशाच्या शत्रूंना फायदा होत असल्याचं मला वाटतं. त्यामुळे मी माझं वक्तव्य मागे घेऊन माफी मागते' अशा शब्दात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने माफी मागितली होती.
कोण आहे साध्वी प्रज्ञा?
संपूर्ण नाव - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
मूळ गाव - मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील कछवाहा
रा. स्व. संघाच्या संपर्कात आल्यानंतर तिने संन्यास घेतला. ती अभिनव भारत संघटनेची सदस्य आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात ती आरोपी होती. स्फोटाच्या ठिकाणी तिची बाईक सापडली होती. त्यानंतर तिच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. 2016 मध्ये एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये प्रज्ञा सिंहला दोषमुक्त ठरवण्यात आलं होतं. तिच्यावरील मोक्का हटवण्यात आला आणि प्रज्ञा ठाकूरवर करकरे यांनी केलेली कारवाई सुसंगत नव्हती, असं सांगण्यात आलं.
संघ प्रचारक आणि समझोता एक्स्प्रेस स्फोटातील आरोपी सुनिल जोशी हत्याप्रकरणातही साध्वी प्रज्ञाचं नाव होतं. पण 2017 मध्ये मध्य प्रदेशातल्या देवास कोर्टाने प्रज्ञाला सुनील जोशी हत्येप्रकरणी निर्दोष मुक्त केलं होतं.
साध्वी प्रज्ञा यांच्याकडे 4 लाख रुपयांची संपत्ती, चांदीचं ताट, चार ग्लास आणि कमंडलू!
कोण होता नथुराम गोडसे?
नथुराम गोडसेने पुण्याजवळ बारामती येथे प्राथमिक शिक्षण घेतले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी त्याने हायस्कूलचे शिक्षण मध्यावरच सोडलं. नथुराम गोडसे सुरुवातीला अखिल भारतीय काँग्रेसमध्ये सक्रिय होता. मात्र नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि 1930 अखिल भारतीय हिंदू महासभेत गेला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची फाळणी झाली त्यावेळी झालेल्या धार्मिक दंगलींमुळे नथुराम गोडसे दु:खी झाला होता. या दंगलींसाठी नथुराम गोडसे महात्मा गांधींना जबाबदार मानत होता. त्यामुळेच त्याने चिडून आपल्या साथीदारांसह महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचला.
त्यानुसार 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने दिल्लीतील बिर्ला भवनात गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली. गांधींजींच्या हत्येप्रकरमी नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटेला 15 नोव्हेंबर 1949 रोजी पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली.
बाबरी मशीद पाडल्याचं वक्तव्य
मी बाबरी मशीद पाडायला गेले होते, आम्ही मिळून मशीदीचा ढाचा पाडला आणि आता मंदिर बांधायलादेखील जाणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर निवडणूक आयोगाने पुन्हा आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली होती.
दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह
मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना पाहायला मिळणार आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने भाजपप्रवेश केल्यानंतर तिला लगेच उमेदवारी जाहीर झाली होती.
"दहशतवाद संपवण्यासाठी एका साध्वीला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले आहे."असं म्हणत साध्वीने दिग्विजय सिंहांनाही दहशतवादी संबोधलं होतं.