दिसपूर : आसामच्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याची सध्या संपूर्ण देशात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, आसामची आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजुक्ता पारशरने आपल्या 15 महिन्यांच्या कारकीर्दीत 16 दहशतवाद्यांचा खात्मा, तर 64 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या या धाडसी कामगिरीची सध्या देशभर चर्चा सुरु आहे.


आसाममध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, दिल्लीतल्या इंद्रप्रस्थ कॉलेजमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. इथून त्यांनी पॉलिटिकल सायन्स शाखेची पदवी मिळवली. यानंतर त्यांनी दिल्लीतल्याच जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून 'अमेरिकेचं परराष्ट्र धोरण' या विषयात पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं.

2006 मध्ये आयपीएस परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन 85 वी रँक मिळवली. आयपीएस अधिकारी म्हणून पोलीस सेवेत रुजू होताना गुन्हेगारांचा खात्मा करण्याची शपथच त्यांनी घेतली. त्यांची सर्वात पहिली पोस्टिंग 2008 मध्ये आसामच्याच माकुममध्ये सहाय्यक कमान्डेंट ऑफिसरच्या रुपात झाली.

यावेळी संजुक्तांच्या धाडसी कामगिरीमुळे अधिकारी वर्गात त्यांच्या नावाची मोठी चर्चा सुरु झाली. त्यामुळेच काही दिवसांतच त्यांना उदालिगिरीमधील बोडो आणि बांगलादेशीयांमधील हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

आपली पहिलीच मोहीम फत्ते करत, त्यांनी 15 महिन्यात 16 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर 64 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.

सध्या त्यांच्या याच दबंगगिरीमुळे केवळ आसाममध्येच नव्हे, तर संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. पण दुसरीकडे आसाममध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा संयुक्तांना प्रचंड तिटकारा आहे. त्याविरोधात लढण्यासही त्या सदैव तयार असते.

संजुक्ता यांना चार वर्षीय मुलगा देखील आहे. पण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना, त्यांनी कर्तव्यात कधीही कसूर सोडली नाही.

संजुक्ता नुकत्याच एका मोहिमेत दहशतवाद्यांशी लढण्यासाठी स्वत: हातात एके 47 घेऊन मैदानात उतरल्या होत्या. गेल्या काही वर्षात त्यांनी बोडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेत स्वत:ला झोकून दिलं आहे.