मुंबई/लखनऊ : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर शाईफेक झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. माझ्यावर शाईचा थेंबही उडाला नाही, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये राऊत यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाल्याचं वृत्त आहे.

धक्कादायक बाब म्हणजे शिवसैनिकानेच शाईफेकीचा प्रयत्न केला. एएनआय या वृत्तसंस्थेने हा दावा केला आहे. सूर्य भान असं शाई फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

'लखनऊ शिवसेना कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये स्वागत करण्यावरुन आपापसात मारामारी झाली. मी आलो त्यावेळी सर्व प्रकरण मिटलं होतं. माझ्या अंगावर कोणीही शाई फेकली नाही.' असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशचा शिवसेना संपर्क प्रमुख विनय शुक्ला याला शिवसैनिकांनी जबर मारहाण करण्यात आली. विनय शुक्ला याने गेली सहा महिने उत्तर प्रदेश शिवसेनापक्षांतर्गत गैरकारभार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील शिवसैनिक संतप्त झाले होते.

शिवसैनिकांनी विनय शुक्लाच्या विरुद्ध अनेक तक्रारी करणारे पत्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी पाठवले होते. आज लखनऊतील गेस्ट हाऊसजवळ विनय शुक्लाच्या गाडीला शिवसैनिकांनी घेराव घालून त्याला जबर मारहाण केली.

शिवसैनिकाकडूनच संजय राऊतांवर शाई फेकीचा प्रयत्न


गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे वादाच्या केंद्रस्थानी आहेत. कारण संजय राऊत हे कार्यकारी संपादक असलेल्या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात, मराठा मोर्चाबाबत वादग्रस्त कार्टून छापून आलं होतं.

व्यंगचित्र प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उमटली होती. याप्रकरणी आधी संजय राऊत यांनी माफी मागण्यास टाळाटाळ केली होती. मात्र  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर, संजय राऊत यांनीही दिलगिरी व्यक्त करणारं पत्रक प्रसिद्ध केलं होतं.

पाहा व्हिडिओ :