नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकबाबत प्रश्न उपस्थित करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल भारतीय सैन्याचा अपमान करत असल्याचा आरोप, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे. सर्जिकल स्ट्राईकबाबत पाकिस्तान खोटा दावा करत असून गैरसमज पसरवत आहे. पाकिस्तानच्या या खोट्या प्रचाराचा सरकारने पर्दाफाश करावा, असं केजरीवाल म्हणाले होते.
केजरीवाल यांच्या या विधानामुळे भाजपचा संताप झाला आहे. "केजरीवालजी, तुम्ही पाकिस्तानी मीडियाच्या हेडलाईनमध्ये आहात, याची तुम्हाला माहिती असावी. राजकारण वेगळी गोष्ट आहे. मात्र अशी कोणतीही विधानं करु नका, ज्यामुळे भारतीय सैन्याचं मनौधैर्य खचेल," असं रवीशंकर प्रसाद म्हणाले. रवीशंकर प्रसाद म्हणाले की, "जेव्हा संपूर्ण देश एकजूट आहे, तेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्याने अशी वक्तव्यं करु नये, ज्यामुळे पाकिस्तान आणि त्यांच्या लष्कराला प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळेल."
भारताने सर्जिकल स्ट्राईक केला नसल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. उलट भारतावरच गोळीबाराचा आरोप करत आहे. याचवेळी केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकबाबत केजरीवाल यांनी मोदी सरकारला पुरावे देण्याचं आवाहन केलं आहे.