नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रपती शासन आम्ही लावलं नाही. ज्यांनी लावलं ते पळून गेले. सरकार स्थापन करण्याची जबाबदारी निवडणुकीत सर्वात मोठा ठरलेल्या पक्षाची असते. सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप पळून गेल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर संजय राऊत हे पवारांना भेटायला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते.


या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक निकाल लागून महिना देखील झालेला नाही. लवकरच शिवसेना नेतृत्त्वात महाराष्ट्रात स्थिर सरकार येईल असा विश्वास राऊत यांनी पुन्हा व्यक्त केला. शरद पवारांच्या भेटीला आलो कारण महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला आहे आणि शरद पवार हे देशाचे कृषीमंत्री होते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडण्याच्या अनुषंगाने मी त्यांच्याशी चर्चा केली असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.



शरद पवार हे महाराष्ट्राचे, देशाचे नेते आहेत. त्यांना भेटणं, काही विषयावर चर्चा करणं हे माझं नित्याचं काम आहे. महाराष्ट्रातल्या ओल्या दुष्काळासंदर्भात पंतप्रधानांना स्थितीची कल्पना द्यायला हवी, सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जाता येईल का यावर चर्चा झाली, असे राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट लवकरात लवकर दूर व्हावी या संदर्भात त्यांचे आणि आमचे एकमत आहे. महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात स्थिर सरकार येईल. एवढं मी खात्रीने सांगू शकतो, असंही पवारांच्या भेटीनंतर राऊत म्हणाले.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत काय चाललं आहे, याची उत्तरं मी कशी देऊ. पवारांनी जर काही मत व्यक्त केलं असेल तर त्याला काऊंटर करणं बरोबर नाही, असेही ते म्हणाले.