सॅनिटरी नॅपकिन करमुक्त, जीएसटी कौन्सिलचा निर्णय
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2018 06:12 PM (IST)
जीएसटी कौन्सिलची 28 वी बैठक पार पडली. 28 टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमधून अनेक वस्तूंना वगळण्यासह इतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : सॅनिटरी नॅफकिनला जीएसटीतून वगळण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात जीएसटी कौन्सिलकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता सॅनिटरी नॅपकिनच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. सॅनिटरी नॅपकिनवर याआधी 12 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. मात्र आता जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवल्याने कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. जीएसटी कौन्सिलची 28 वी बैठक पार पडली. 28 टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमधून अनेक वस्तूंना वगळण्यासह इतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. बांबू फ्लोअरिंगवरील जीएसटी कमी करण्यात आले असून, त्यावर आता केवळ 12 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. इथेनॉलवरील जीएसटी 18 टक्क्यांहून 5 टक्के करण्यात आले असून, पेट्रोल ब्लेंडमध्ये या इथेनॉलचा वापर होतो. सरल रिटर्न दाखल करण्याच्या प्रक्रियेलाही जीएसटी कौन्सिलने मंजुरी दिली आहे. तसेच, 5 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेचा टॅक्स भरणाऱ्यांना दर महिन्याला रिटर्न फाईल करावं लागेल.