अलवर (राजस्थान) : जमावाकडून हत्येचा आणखी एक धक्कादायक प्रकार राजस्थानच्या अलवरमध्ये समोर आला आहे. एएनआयच्या माहितीनुसार, गो तस्कर असल्याच्या संशयातून कथित गो रक्षकांनी अकबर नावाच्या व्यक्तीची मारहाण करुन हत्या केली. अलवरच्या रामगड परिसरातील लल्लावंडी गावातील ही घटना असून मृत अकबर हरयाणातील कोलागावचा रहिवासी आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अकबर आणि त्याचा मित्र शुक्रवारी रात्री दोन गायी घेऊन जात होते. लल्लावंडी गावाजवळ स्थानिक रहिवाशांनी अकबर आणि त्याच्या मित्राशी गायींवरुन वाद घातला आणि त्यांच्यावर हल्ला केला. गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत अकबर गंभीर जखमी झाला.


मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अकबरला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अकबरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून अद्याप कोणालाही याप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही. अलवरचे एएसपी अनिल बेनिवाल यांनी सांगितलं की, 'अकबर गो तस्कर होता की नाही हे अजून स्पष्ट नाही. आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.'


मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याकडून निषेध
अलवर येथील घटनेचा वसुंधरा राजे यांनी निषेध केला आहे. वसुंदरा राजे यांनी ट्वीट करत म्हटलं की, गो तस्करीच्या संशयातून झालेल्या हत्येचा कडक शब्दात निषेध करते. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही वसुंधर राजे यांनी दिली आहे.





असदुद्दीन ओवेसी यांची टीका
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्वीट करत सरकारवर हल्लाबोल केला. 'घटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत भारतात गायीला जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. पण मुस्लिमांना तो अधिकार नाही. त्यामुळे त्यांना मारलं जात आहे. मोदी सरकारची चार वर्ष – लिंच राज' असा संताप ओवेसी यांनी व्यक्त केला आहे.