नवी दिल्ली : समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी स्वामी असीमानंदसह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पंचकुलातील एनआयए कोर्टाने निर्णय दिला आहे.
मुख्य आरोपी असीमानंद याच्यासह लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजेंद्र चौधरी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
18 फेब्रुवारी 2007 रोजी हरियाणातील पानिपतमध्ये समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. भारत आणि पाकिस्तानला जोडणारी ही ट्रेन अमृतसरमधील अतारी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना स्फोट झाला.
स्फोटात समझौता एक्स्प्रेसचे दोन डबे जळून खाक झाले. या स्फोटात 68 जणांना प्राण गमवावे लागले होते, त्यापैकी बहुतांश पाकिस्तानी नागरिक होते, तर चौघे भारतीय रेल्वेचे अधिकारी होते.
नबा कुमार सरकार उर्फ स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजेंद्र चौधरी यामध्ये आरोपी होते. असीमानंदवर स्फोटासाठी साहित्य पुरवल्याचा आरोप होता.
कोण आहे असीमानंद?
असीमानंदने आपलं तारुण्य संघाच्या आदिवासी कल्याण आश्रममध्ये घालवलं. स्फोटाचा कट रचल्याचा आरोप ज्या कालावधीत होता, त्यावेळी तो आदिवासी कल्याण आश्रमाचे, धार्मिक विंग जागरण विभागाचा राष्ट्रीय प्रमुख होता. त्याच्यासाठी हे पद खास तयार करण्यात आलं.
2005 मध्ये एम एस गोलवलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त असीमानंदच्या कार्याचा गौरव करण्यात आला. असीमानंदला विशेष गुरुजी सन्मान देण्यात आला. या सन्मानासोबत त्याला एक लाख रुपये देण्यात आले. या गौरव सोहळ्यात भाजपचे माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी व्याख्यान दिलं. मात्र असीमानंदवर आरोप होऊनही दिलेला सन्मान, ना संघाने परत घेतला, ना भाजपने.
समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंदसह चौघांची निर्दोष मुक्तता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Mar 2019 06:12 PM (IST)
समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी असीमानंद याच्यासह लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजेंद्र चौधरी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -