नवी दिल्ली :  मराठा समाजालाही आरक्षण ही सध्याची गरज आहे. त्यासाठी संसदेच्या माध्यमातून आवाज उठवू, असं राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. त्यानिमित्ताने नवनिर्वाचित खासदारांनी आज शपथ घेतली.

 

यावेळी एबीपी माझाशी बोलताना संभाजीराजे म्हणाले,"बऱ्याच दिवसांनी राजघराण्याला न्याय मिळाल्यानं आनंद आहे. मराठा समाजाला आरक्षणासाठी आवाज उठवणार, यापुढेही काम चालू ठेवणार. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायलयात प्रलंबित आहे. मात्र चांगले वकील देण्यासाठी प्रयत्न करु".

 

याशिवाय राजस्थानातल्या किल्ल्यांना अनुदान मिळते, पण  महाराष्ट्रातल्या का नाही? असा सवाल उपस्थित करत, त्यासाठी आपण प्रयत्न करु, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

 

पवारसाहेबांवर प्रतिक्रिया नाही

शरद पवारांच्या फडणवीस - छत्रपती नियुक्ती वक्तव्याबाबत संभाजीराजेंना विचारण्यात आलं. त्यावर पवारसाहेब चाळीस वर्षे राजकारणात आहेत, त्यांच्या वक्तव्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. मी खासदारकी मागायला गेलो नव्हतो,  मोदींनी, फडणवीस यांनी राजघराण्याला सन्मान दिला, असं संभाजीराजे म्हणाले.

 

शरद पवार काय म्हणाले होते ?

छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्यसभेवरील निवडीबाबत पवारांना विचारणा केली, त्यावर सुरुवातीला या निवडीकडे राजकीय दृष्टीकोनातून बघण्याची गरज नाही, असं मत पवारांनी व्यक्त केलं. मात्र त्यानंतर इतिहासाचा दाखलाही त्यांनी दिला. यावेळी पहिल्यांदाच फडणवीसांकडून छत्रपतींची निवड झालीय, असंही मिश्किलपणे ते म्हणाले.
पेशव्यांची छत्रपतींनी नियुक्ती केली होती. आज पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केली, असं पवार म्हणाले.  त्यामुळे पवारांचं हे विधान मिश्किल असलं तरी त्याची खमंग चर्चा झाली.

 

संबंधित बातम्या

मी कधीही सहज बोलत नाही : शरद पवार



मी केवळ छत्रपतींचा सेवक, फडणवीसांचं पवारांना उत्तर