संभाजीराजांच्या मदतीमुळं कोल्हापुरातली राजकीय ताकद वाढवण्याचा भाजपचा मानस आहे. याआधी भाजपनं धनगर आरक्षणासाठी झगडणारे डॉक्टर विकास महात्मे आणि दलितांचं प्रतिनिधीत्व करणारे डॉक्टर नरेंद्र जाधव यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. आता मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींची खासदार म्हणून नियुक्ती करून भाजपनं सोशल इंजीनिअरिंगचा यशस्वी प्रयोग केल्याचं बोललं जातं आहे.
राष्ट्रपती कोट्यातून नियुक्त केलेले गायत्री परिवाराचे प्रणव पंड्या यांनी खासदारकी नाकारल्यानं एक जागा रिक्त होती. त्याच जागेवर संभाजीराजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपनं गेल्या महिन्याभरात महाराष्ट्राचे पाच खासदार राज्यसभेवर पाठवले आहेत.
नरेंद्र जाधव( राष्ट्रपती नियुक्त)
विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे, सुरेश प्रभू (आंध्रातून),
छत्रपती संभाजीराजे (राष्ट्रपती नियुक्त)
2009ची लोकसभा निवडणूक संभाजीराजे राष्ट्रवादीकडून लढले होते. पण तिकीट नाकारल्यानं दुखावलेल्या मंडलिकांनी अपक्ष लढून त्यांना पराभूत केलं होतं.
विकास महात्मेंची सरप्राईज एण्ट्री
नागपूरचे डॉक्टर विकास महात्मे यांची सरप्राईज एण्ट्री झाली. कारण डॉ. महात्मे हे गेली 2-3 वर्ष धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढत आहेत. त्यांना उमेदवारी देऊन भाजप धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर असलेली धनगर समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.
प्रत्येक पक्षात लॉबिंग
राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं सध्या प्रत्येकच पक्षात जोरदार लॉबिंग, शह काटशहाचं अंतर्गत राजकारण पाहायला मिळतं. त्यापैकी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून पी चिदंबरम, शिवसेनेकडून संजय राऊत, भाजपकडून पीयुष गोयल यांचं नाव जाहीर करण्यात आलं. त्यानंतर प्रश्न उरला होता तो भाजपचे आणखी दोन उमेदवार कोण असणार याचा, तो आता निकाली निघाला.
काँग्रेसचं संख्याबळ
संख्याबळानुसार काँग्रेसला एकच उमेदवार राज्यसभेवर पाठवता आला. सुशीलकुमार शिंदे यांच्यासह राज्यातल्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट करत हायकमांडनं मात्र चिदंबरम यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं. चिदंबरम यांच्या नावालाही वादाची झालर आहे तरीही.
सगळ्याच पक्षांचा प्रयत्न आहे राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध करण्याचा. त्यामुळे सहा जागांसाठी सहाच उमेदवार रिंगणात येतील अशी शक्यता आहे. मोदी- शहांची जोडगोळी यावेळी महाराष्ट्रातून कुणाला संधी देणार, आणि पक्षातलं जातीय संतुलन राखण्यासाठी नेमकी काय गणितं आखणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.