विशाखापट्टणमः केरळच्या गोदावरी जिल्ह्यातील चिंतलापुडी येथे एक अनोखी शाळा भरली आहे. या शाळेतील विद्यार्थी व्हिडिओ चाटींगद्वारे अमेरिका आणि कॅनडा येथील अनिवासी भारतीय मेंटर्सकडून शिक्षण घेत आहेत.
एपी सोशल वेलफेअर स्कूल असं या शाळेचं नाव आहे. या शाळेत एकूण 320 विद्यार्थी असून ही शाळा अनुसुचित जाती जमाती कल्याण विभागामार्फत चालविली जाते, अशी बातमी एका इंग्रजी दैनिकाने दिली आहे. सरकारी शाळांसह खाजगी शाळांसाठी ही शाळा आदर्श उदाहरण बनलं आहे.
अशी चालते शाळा
या शाळेमध्ये नियमित वर्ग भरवण्यात येतात. दर रविवारी दोन तास स्काईपद्वारे अमेरिका आणि कॅनडा येथील इंजीनिअर्स, डॉक्टर आणि पीएचडी धारक मेंटर्ससोबत विद्यार्थी संवाद साधतात. मेंटर्स विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं आवडीने निरसन करतात. तसंच विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचं काम करतात. आतापर्यंत स्काईपद्वारे 12 वर्ग भरवण्यात आले आहेत, असं शाळेचे मुख्याध्यापक राजा राव यांनी सांगितलं.
ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत शाळा सुरु
एपी सोशल वेलफेअर स्कूल ही शाळा एका ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. जानकारांच्या मदतीने अमेरिका आणि कॅनडा येथील अनिवासी भारतीयांशी संपर्क करण्यात आला. त्यांनी होकार दिल्यानंतर अनुसुचित जाती जमाती कल्याण मंत्री व्ही. रामुलू यांची परवानगी घेण्यात आली.
रामुलू यांनी प्रस्ताव मांडताच तत्काळ होकार दिला. सोबतच सर्व साहित्य घेण्यासाठी निधी देखील उपलब्ध करुन दिला, असं शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं.