नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर सध्या समाजवादी पक्षातील यादवीचे वादळ घोंघावत आहे. सध्या हे वादळ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून दिल्लीकडे सरकले असले, तरी पिता-पुत्रातील गृहकलह अद्याप क्षमलेला नाही. आज समाजवादी पक्षातीलच दोन्ही गटाच्या नेत्यांनी निवडणुक आयोगाकडे हजेरी लावून पक्षाच्या चिन्हासाठी दावा सांगितला आहे. आता यावर निवडणूक आयोगाला 17 जानेवारीपर्यंत निर्णय द्यायचा आहे.
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी आज सकाळी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला भेट देऊन मतभेदासंदर्भात माहिती दिली, तसेच यावर लवकरच तोडगा काढला जाईल असेही स्पष्ट केलं. या भेटीवेळी मुलायम सिंह यादव यांच्यासह शिवपाल यादव आणि अमर सिंह हेही उपस्थित होते. जवळपास एक तास झालेल्या बैठकीनंतर अखिलेश माझा मुलगा असून आमच्यातील मतभेदांवर लवकरच तोडगा काढला जाईल असे मुलायम सिंह यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, मुलायम सिंह यादव यांनी याआधी राज्यसभेच्या अध्यक्षांनाही पत्र लिहून अखिलश यादव यांच्या गटातील रामगोपाल यादव यांना पक्षनेते पदावरुन हटवण्याची मागणी केली. त्यामुळे हा गृहकलह आणखीनच वाढला आहे.
मुलायम सिंह यादव यांच्या भेटीनंतर रामगोपाल यादव यांनीही आयोगाच्या कार्यालयात हजेरी लावून कागदपत्रांची पुर्तता केली. यानंतर माध्यमांशी बोलताना रामगोपाल यादव यांनी शिवपाल यादव आणि अमर सिंह यांच्यावर हल्ला चढवला. रामगोपाल यादव म्हणाले की, ''काही व्यक्ती नेताजींची फसवणूक करत असून, त्यांना 200 विधायकांचे समर्थन असल्याची खोटी माहिती देत आहेत. पण आता यातलं सत्य बाहेर आलं आहे.'' तसेच तडजोडीचे सर्व मार्ग बंद झाले असल्याचे सांगितले.
वास्तविक, ज्या व्यक्तीकडे निवडणून आलेल्या आमदारांच्या बहुमताची मॅजिक फिगर असेल, त्यांच्याकडेच पक्षाची धुरा सोपवली जाते. सध्या यादव कुटुंबांतील पिता-पुत्राच्या संघर्षामुळे पक्षाचे सायकल हे चिन्ह कुणाकडे जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
त्यातच निवडणूक आयोगात हे प्रकरण गेल्याने आयोगालाही यावर 17 जानेवारी पूर्वी निर्णय घोषित करणे गरजेचे आहे. कारण याच दिवशी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान 2 फेब्रुवारी रोजी होणार असून, अधिसूचना जाहीर झाल्यानंतर नामांकन अर्जाची सर्व प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अखिलेश आणि मुलायम सिंह यादव यांच्या गटातील उमेदवारांना पक्षाच्या एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येणार नसल्याने, सध्या उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे.