नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करुन देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिकने हरियाणाच्या भाजप सरकारवर टीका केली आहे. साक्षीने ट्वीट करुन हरियाणातील मनोहरलाल खट्टर सरकार आपलं वचन कधी पूर्ण करणार? असा सवाल विचारला आहे.


साक्षीने ट्विटरवरुन राज्य सरकारप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे. तिने आपल्टा ट्विटमधून, ''आपण पदकाची कमाई करण्याचे वचन पूर्ण केलं. पण राज्य सरकार बक्षिसाचं आपलं वचन कधी पूर्ण करणार?'' असा सवाल विचारला आहे.


साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केल्यानंतर, हरियाणाच्या भाजप सरकारने साक्षी मलिकला दीड कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर केलं होतं. पण अजूनही आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याचं साक्षीचं म्हणणं आहे.

दरम्यान, हरियाणाचे क्रीडा मंत्री अनिल विज यांनी साक्षी मलिकचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तिला राज्य सरकारच्यावतीने दीड कोटींचा चेक यापूर्वीच दिला आहे. तसेच तिला नोकरी देण्यासाठी विद्यापीठात वेगळं पद निर्माण केलं गेलं आहे, असं सांगितलं.