Sajjan Singh Verma on Kamal Nath : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ (Kamal Nath) हे पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांचे निकटवर्तीय सज्जन सिंग वर्मा यांची एक मोठा दावा केला आहे. कमलनाथ यांची पक्षात उपेक्षा केली जात आहे, परंतु सध्या तरी ते काँग्रेस सोडण्याचा विचार करत नाहीत असं ते म्हणाले. 


काँग्रेस नेते सज्जन सिंग वर्मा आणि कमलनाथ यांची भेट झाली असून त्यांच्यामध्ये काही चर्चा झाल्याचं एएनआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुका पाहता मध्य प्रदेशातील 29 लोकसभा जागांवर जातीय समीकरण कसे राखता येईल, निवडणुकीसाठी काय रणनीती आखता येईल याकडे कमलनाथ यांनी भर दिला आहे असं वर्मा म्हणाले.  


उपेक्षेमुळे कमलनाथ पक्ष नेतृत्वावर नाराज


वर्मा यांची प्रतिक्रिया कमलनाथ यांचे निष्ठावंत आणि माजी राज्यमंत्री दीपक सक्सेना यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यानंतर आली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीबद्दल कमलनाथ यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून, त्यांची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे कमलनाथ पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचेही त्यांनी सूचित केले.


भूपेश बघेल पराभूत होतील असं वाटलं नव्हतं


दीपक सक्सेना म्हणाले की, 2023 च्या विधानसभा निवडणुकीनंतर कमलनाथ यांची उपेक्षा झाली. मात्र भूपेश बघेल हरतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. आम्ही छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान गमावले. आम्ही येथे हरू असे वाटले नव्हते. मात्र पराभवाचे खापर एकट्या कमलनाथ यांच्यावरच का फोडण्यात आलं?


छिंदवाड्याच्या विकासासाठी लोकांना भाजपमध्ये जायचं आहे


माजी राज्यमंत्री सक्सेना म्हणाले की, छिंदवाड्याच्या विकासासाठी कमलनाथ यांनी भाजपमध्ये जावे अशी जनतेची इच्छा आहे. त्यांना पदावरून हटवल्यानंतर काँग्रेसच्या 11 ज्येष्ठ सदस्यांच्या गटाने चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला. आमची अशीच उपेक्षा होत असेल तर भाजपमध्ये सहभागी होऊन जनतेच्या हिताची कामे केली तर बरे होईल असे सदस्यांनी सांगितले. 


कमलनाथ हे काँग्रेस नेतृत्वावर नाराज असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमात सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. 


ही बातमी वाचा :