लखनऊ: वाराणसी शहरातील मंदिरांमधून सनातन रक्षक सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे साईबाबांच्या मूर्ती हटवायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत सनातन रक्षक संस्थेने शहरातील 14 मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती (Saibaba Idols) हटवून त्यांचे गंगेत विसर्जन केले आहे. यामध्ये बडा गणेश मंदिराचाही समावेश आहे देशभरात साईबाबांना (Shirdi Saibaba) मानणारा मोठा भक्त समुदाय आहे. त्यामुळे वाराणसीमधील या घटनेवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


सनातन रक्षक संस्थेकडून वाराणसीच्या आणखी 28 मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येणार आहेत. साईबाबा मुस्लीम होते. त्यांचा सनातन हिंदू धर्माशी कोणताही संबंध नाही. कोणीही साईबाबांची भक्ती, पूजाअर्चा करत असेल, तर त्याला आमचा विरोध नाही. मात्र, आम्ही हिंदू मंदिरांमध्ये साईबाबांची मूर्ती ठेवून देणार नाही, अशी भूमिका सनातन रक्षक संघटनेचे अजय शर्मा यांनी घेतली आहे.


या सगळ्यासाठी सनातन रक्षक संघटनेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला दिला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालात साईबाबा यांना चांदबाबा म्हणावे, असे नमूद करण्यात आल्याचा दावा  सनातन रक्षक संघटनेच्या दीपक यादव यांनी केला. याबाबत रविवारी चर्चा झाल्यानंतर सनातन रक्षक संघटनेकडून सोमवारपासून वाराणसी येथील मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवायला सुरुवात झाली होती. मुळात साईबाबांची मूर्ती ज्यावेळी मंदिरांमध्ये बसवण्यात आली, तेव्हाच विरोध व्हायला हवा होता. मंदिरांमधील पुजारी आणि ब्राह्मण समुदायाने साईबाबांची पूजाअर्चा करण्यापासून दूर राहिले पाहिजे. ज्यांना साईबाबांची पूजाअर्जा करायची आहे, त्यांनी स्वतंत्र मंदिर तयार करावे आणि त्यांची भक्ती करावी. आमचा त्याला विरोध नाही, असेही दीपक यादव यांनी सांगितले.


देशातील अनेक भक्तगण शिर्डीला का जातात, असा प्रश्नही दीपक यादव यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, हिंदू धर्माने आजवर सर्व विचारधारा सामावून घेतल्या आहेत. त्यामुळे अनेकजण शिर्डीला जातात. त्यामध्ये काही गैर नाही. ज्या लोकांना साईबाबांची भक्ती करायची आहे, त्यांनी ती करावी. आम्ही कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही, असे यादवा यांनी म्हटले.


हनुमानगढी मंदिरांच्या महतांचांही साईबाबांना विरोध


योग्य माहिती नसल्याने आतापर्यंत मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्तीची पूजा केली जात होती. साईबाबा हे धर्मगुरु, पीर, अवलिया असू शकतात, पण ते देव, ईश्वर असू शकत नाहीत. त्यामुळे वाराणसीच्या मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवणाऱ्यांना मी धन्यवाद देतो. सनातनी मंडळींनी सर्व मंदिरांमधून चांदपीर (साईबाबा) यांच्या मूर्ती हटविल्या पाहिजेत, असे अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी म्हटले.


आणखी वाचा


साईबाबा देव नाहीत, बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांचं वादग्रस्त वक्तव्य; साईभक्तांकडून निषेध