Shirdi Sai Baba : नेहमी काही ना काही वक्तव्ये करून चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे (Bageshwer Dham) महंत पंडित धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shasri) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी जबलपूरमध्ये (Jabalpur) श्री साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी शिर्डीच्या साईबाबांबाबत केले आहे. कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असंही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता साईबाबांविषयी (Sai Baba) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून राजकीय नेत्यांनी निषेध व्यक्त धीरेंद्र शास्त्रीवर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला (Shirdi Sai Baba) असून धीरेंद्र शास्त्रीने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अवघ्या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या प्रति बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यापूर्वी शंकराचार्य स्वरूपानंद यांनी अशाच प्रकारे साईंच्या विरोधात वक्तव्य केलं होतं, मात्र धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यानंतर साई भक्तांनी मात्र साईबाबा आमचे दैवत आहे अशी प्रतिक्रिया दिलीय.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे शिर्डी येथील ग्रामस्थांनी संतप्त होत धीरेंद्र शास्त्रीना जोरदार प्रत्युतर दिले आहे. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक साईबाबांविषयी नेहमीच अशी वक्तव्ये करत असतात. साईबाबा देव आहेत की, नाही यासाठी धीरेंद्र शास्त्रीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. धीरेंद्र शास्त्रींनी एकदा साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत यावे त्यांची अक्कल ठिकाणावर येईल अशा भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. शास्त्री यांनी तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले होतं आणि त्यानंतर आता साईबाबा बद्दल याच धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने साईभक्तांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

Continues below advertisement

साईबाबांनी त्यांच्या हयातीत वैदिक परंपरा जपल्या आहेत. त्यामुळे साईसंस्थाकडून साई मंदिरात आजही वैदिक परंपरा जपल्या जातात. साईबाबांना नावं ठेवणारी अनेक लोकं आजपर्यंत आली गेली, मात्र आम्ही बाबांच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो. धीरेंद्र शास्त्रींनी महाराष्ट्राची संत परंपरा समजून घ्यावी आणि साईभक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करू नये, असा सल्ला साईमंदिराचे सेवानिवृत्त मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी धीरेंद्र शास्त्रीना दिला आहे. 

काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री ?

जबलपूरमध्ये सुरु असलेल्या एका कार्यक्रमानिमित्त धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, आपल्या धर्माच्या शंकराचार्य यांनी साईबाबांना देवाचे स्थान दिलेलं नाही. आणि शंकराचार्य यांचे म्हणणे समजून घेणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण देव असू शकत नाहीत. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणी सिंह होऊ शकत नाही, देव देव आहेत, संत संत आहेत. त्यामुळे साई हे देव नाहीत हे शंकराचार्य यांचे विधान प्रमाण असल्याचे बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.

राधाकृष्ण विखे यांची कारवाईची मागणी 

समाजात अशी लोक बाबा बुवाचे रूप घेउन स्वतःला देव म्हणवून घेतात, लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात. शासनाला विनंती आहे की, अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. आशा विधानातून ते धार्मिक तेढ निर्माण करू पाहत आहेत. सामाजिक अशांतता निर्माण करत आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या साईबाबांवर अशा प्रकारे वक्तव्य करणे चूक असून अशाप्रकारे चिखलफेक करणे चुकीचे असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड संतापले... 

धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबा यांची वादग्रस्त वक्तव्य केल्यांनतर राजभरातुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरले आहे. ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'कालिचरण महात्मा गांधींना काय वाटेल ते बोलतो, 'बागेश्वर साईबाबांचा अपमान करतो काय वाट्टेल ते बोलतो'. 'महाराष्ट्रातली प्रजा सोशिक आहे, त्यांना राग येत नाही'. तर 'सरकार नपुंसक असून कोणी ही या काहीही बोला, कुणालाही बोला, सरकार काही करणार नाही' अशा आशयाचे ट्विट केले आहे. 

Bageshwar Maharaj : कधी भुतांना पळवण्याचा दावा तर कधी दिव्य दृष्टीचा महिमा, कोण आहेत बागेश्वर महाराज उर्फ धीरेंद्र शास्त्री?