इंदूर : इंदूरमध्ये दुचाकीस्वार मॉडेलसोबत झालेल्या छेडछेडीच्या घटनेचे मोठे पडसाद मध्य प्रदेशमध्ये उमटले आहेत. पोलिसांनीच पीडित तरुणीशी संपर्क साधून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

स्कूटरवरुन जाताना दोघा दुचाकीस्वार तरुणांनी आपला स्कर्ट खेचला आणि अश्लाघ्य भाषेत छेडछाड केली, असा आरोप मॉडेलने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर केला होता. तोल सावरता न आल्यामुळे आपण स्कूटरवरुन पडलो आणि मांड्यांना दुखापत झाली, असंही तिने फोटो पोस्ट करुन लिहिलं होतं.

इंदूरमधील गजबजलेल्या रस्त्यावर आपण दुखापतग्रस्त होऊन पडलेलं असतानाही, कोणी टवाळखोरांना पकडण्यासाठी माझ्या मदतीला आलं नाही, अशी खंतही तिने व्यक्त केली होती.

'माझ्या स्कर्टमुळे माझ्याशी छेडछाड झाली, हा आरोप किती मूर्खपणाचा आहे. मी पडल्यावर माझ्या मदतीला आलेले एक काकाही मला म्हणतात की तू स्कर्ट घातल्यामुळे हा प्रकार झाला. मला इतकं अगतिक कधीच वाटलं नाही.' असंही ती म्हणाली.

हे ट्वीट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रिट्वीट केलं. पीडित मॉडेलला न्याय देण्याचे आदेश चौहान यांनी डीआयजी आणि कलेक्टरला दिले आहेत. पोलिस घटनास्थळाचं सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहेत.