नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला व्यावसायिक भागीदार मित्रासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची मदत मागितली आहे. मात्र पर्रिकरांना दखल घेण्यास नकार दिला आहे.
काय आहे प्रकरण?
मसुरीतील लॅण्डोर इथं एक रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टचा संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO) सोबत सुरक्षेसंबंधी वाद सुरु आहे. या रिसॉर्टमध्ये सचिनचा व्यावसायिक भागीदार संजय नारंग यांची गुंतवणूक आहे. त्यामुळे या वादाप्रकरणी सचिनने संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची मदत मागितली.
सुट्ट्यांमध्ये सचिन अनेकवेळा या रिसॉर्टवर जातो. त्यामुळेच हे रिसॉर्ट सचिनसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न होता. त्यामुळेच खासदार सचिनने गेल्यावर्षी आपला ऑस्ट्रेलिया दौरा रद्द केला होता.
रिसॉर्टला आक्षेप का?
लॅण्डोर परिसरात जिथे हे रिसॉर्ट आहे, तो भाग लष्कराच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या संवेदनशील भागाच्या 50 फूट परिसरात कोणतंही बांधकाम करण्यास मनाई आहे. त्यामुळे संबंधित रिसॉर्टने या नियमांचं उल्लंघन केलं आहे. इतकंच नाही तर नारंग यांनी टेनिस कोर्ट बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र तिथे इमारत उभी केल्याचा आरोप आहे.
पर्रिकरांशी भेट
या रिसॉर्ट वादाप्रकरणी सचिनने संरक्षणमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. ठरल्याप्रमाणे सचिन आणि मनोहर पर्रिकर यांची भेट झाली. पर्रिकरांनी सचिनचं म्हणणं ऐकलं. मात्र याप्रकरणात दखल देण्यास त्यांनी नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.