मुंबई: रशियाकडून कमी किमतीत कच्च्या तेलाची (crude oil) आयात करण्याच्या भूमिकेचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी समर्थन केलं आहे. सर्व देशांना विकासासाठी उर्जेची गरज आहे, मग कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती लक्षात घेता फायदेशीर व्यवहार करण्याकडे त्यांचा कल असतो. भारतानेही हाच मार्ग अवलंबला असल्याचं एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते बँकॉकमध्ये भारतीय समूदायाला संबोधित करताना बोलत होते. युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरू असेलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने निर्बंध घातले असतानाही भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरू ठेवली आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना भारतीयांना कमी किमतीत उर्जा निर्माण करता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण रशियाकडून कमी दरात कच्चे तेल आयात करत आहोत असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. 


एस जयशंकर म्हणाले की, भारतीयांचे दरडोई उत्पन्न हे दीड लाख रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे आपला देश महाग किमतीमध्ये उर्जा खरेदी करु शकत नाही. त्यामुळे भारतीयांसाठी सर्वात चांगला व्यवहार करणे हे माझं कर्तव्य आहे. भारतीयांचे हितसंबंध जपण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल. 


युक्रेन-रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. युरोपातील अनेक देश हे आता रशियाकडून कमी प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करत आहेत. इतर अनेक पुरवठादार त्यांना कच्च्या तेलाची निर्यात करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी भारतानेही आपले हितसंबंध जोपासले पाहिजेत. त्यामुळे भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करत आहे.  


रशियातील तेल आयातीवरून अमेरिका सातत्याने भारताला लक्ष करताना दिसत आहे. या प्रश्नी भारतावर होणाऱ्या टीकेवर आज परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: