Russian Scientist Death : रशियन शास्त्रज्ञाची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आंद्रे बोटीकोव्ह (Andrey Botikov) असे हत्या झालेल्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. रशियन कोविड-19 लस स्पुटनिक व्ही ही लस तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी आंद्रे बोटीकोव्ह हे एक होते. बोटीकोव्ह यांची बेल्टने गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. गुरुवारी (2 मार्च) त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
बोटीकोव्ह हे रशियातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. त्यांना लसीवरील त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कारही मिळाला होता. 2020 मध्ये स्पुटनिक व्ही लस विकसित करणाऱ्या 18 शास्त्रज्ञांपैकी बोटीकोव्ह एक होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 47 वर्षीय आंद्रे बोटीकोव्ह हे गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अॅण्ड मॅथेमॅटिक्स येथे वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते. गुरुवारी ते मॉस्को येथील घरी आराम करत असताना आरोपी त्यांच्या घरी आला. काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संशयतीत आरोपीने आंद्रे बोटीकोव्ह यांची गळा आवळून हत्या केली. या आरोपीने कौटुंबिक वादातून आंद्रे यांची हत्या केल्याचे समोर आले आहे.
रशियन वृत्तसंस्थेने TASS ने रशियन फेडरेशनच्या तपास समितीच्या हवाल्याने म्हटले आहे की, 47 वर्षीय बोटीकोव्ह हे गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अँड मॅथेमॅटिक्समध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते. गुरुवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोरोनाची लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना 2021 मध्ये 'ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड' पुरस्काराने कोविड लसीवरील कामाबद्दल सन्मानित केले होते. त्यामध्ये बोटीकोव्ह यांचा देखील समावेश होता.
बोटीकोव्ह यांच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 29 वर्षीय तरुणाने किरकोळ वादात बोटीकोव्हचा बेल्टने गळा दाबून खून केला. घटनेनंतर संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला. परंतु, पोलिसांनी तपास करून त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात खटला दाखल करण्यात आला असून तो अनेक वर्षांपासून तुरुंगात आहे. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या