Tamil Nadu: बिहारमधील (Bihar) मजुरांवर झालेल्या कथित हल्ल्यावरुन तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) राजकीय गोंधळ सुरुच आहे. दरम्यान, स्टॅलिन सरकारने शुक्रवारी (3 मार्च) संध्याकाळी सांगितलं की, "तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी उत्तर भारतातील कामगारांवर अत्यंत वाईट हेतूने हल्ले होत असल्याच्या बातम्या खोट्या आहेत." यासंदर्भात तामिळनाडूचे कामगार कल्याण विकास मंत्री सीव्ही गणेशन यांनी एक निवेदन जारी केलं आहे. सध्या याप्रकरणी सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात असून संभ्रम पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले. तसेच, राज्यात असलेल्या उत्तर भारतीय कामगारांना कोणताही धोका नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  


तामिळनाडू सरकारने सांगितलं की, "अनेक राज्यांतील कामगार विकासात मोठं योगदान देत आहेत. उत्तरेकडील राज्यातील कामगार मोठ्या संख्येने पूल बांधकाम आणि मेट्रो रेल्वे यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या विकासात विकासात योगदान देत आहेत. संबंधित कंपन्या त्यांच्या कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा देत आहेत." 






बिहार सरकारचं वक्तव्य 


दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी सांगितलं की, "परप्रांतीयांवर झालेल्या हल्ल्यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक पथक शुक्रवारी (3 फेब्रुवारी) तामिळनाडूला पाठवलं जात आहे." मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, नितीश कुमार यांनी तामिळनाडूमध्ये बिहारमधील लोकांवर झालेल्या कथित हल्ल्याबाबत मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्यासोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बिहारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक तामिळनाडू तपासासाठी जातील. 


दरम्यान, गेल्या दोन दिवसांत तामिळनाडूमध्ये 12 बिहारी मजुरांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तर हजाराहून अधिक मजूर त्याठिकाणी अडकून पडल्याची माहिती समोर आली होती. या घटनेवरुन बिहारमध्ये राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. तसेच, याचे पडसाद बिहारच्या विधानसभेतही उमटल्याचे दिसून आलं. 


काय म्हणाले नितीश कुमार?


नितीश कुमार यांनी ट्वीट केलं की, "तामिळनाडूमध्ये काम करणाऱ्या बिहारमधील मजुरांवर झालेल्या हल्ल्याबाबत मला वर्तमानपत्रांतून कळलं आहे. मी बिहारचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना तामिळनाडू सरकारच्या अधिकाऱ्यांशी बोलून तिथे राहणाऱ्या राज्यातील कामगारांच्या सुरक्षेची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत."


तमिळनाडूमध्ये बिहारमधील मजुरांवर झालेल्या कथित हल्ल्याबाबत शुक्रवारी बिहार विधानसभेत मोठा गदारोळ झाला. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भाजपने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तेजस्वी यांनी शनिवारी तामिळनाडूला भेट दिली आणि सीएम एमके स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रॅलीला हजेरी लावली.


भाजपच्या आरोपांवर तेजस्वी यादव विधानसभेत म्हणाले की, "तुम्ही भारत माता की जय म्हणत असाल तर राज्यांमध्ये द्वेष का पसरवता? हे किती देशभक्ती आहे? तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर तुमच्या केंद्रातील गृहमंत्र्यांकडून चौकशी करा." दरम्यान, भाजपने सभागृहातून सभात्याग केला.