Russia Ukraine Crisis : सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठ संघर्ष सुरू आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने त्याठिकाणची स्थिती बिघडत चालली आहे. नागरिकांना जीव मुठीत धरुन त्याठिकाणी राहावे लागत आहे. अशातच अनेक भारतीय विद्यार्थी, नागरिक युक्रेनमध्ये अडकल्याने चिंता वाढली आहे. भारतातील जवळपास 16 हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत. दरम्यान, कोणत्या राज्यातील किती नागरिक युक्रेनमध्ये अडकलेत ते पाहुयात...
गुजरातमधील सुमारे 2 हजार 500 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. तर 2 हजार 320 विद्यर्थी हे केरळमधील आहेत. हे विद्यार्थी खार्किव आणि कीवमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे भारतात उपस्थित असलेल्या या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. त्याचवेळी, अनेक राज्य सरकारांनी केंद्राला त्यांच्या सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.
तामिळनाडू सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 5,000 विद्यार्थी आणि स्थलांतरित नागरिक हे युक्रेनमध्ये अडकले आहेत. विद्यार्थ्यांच्या आणण्यासंबंधीचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे जाहीर केले आहे. तर महाराष्ट्रातील सुमारे 1 हजार 200 विद्यार्थी, छत्तीसगडमधील 70 विद्यार्थ्यी आणि 100 रहिवासी तेथे अडकले आहेत. गुजरातचे शिक्षण मंत्री जितू वाघानी म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे 2 हजार 500 विद्यार्थ्यांना सुरक्षीतपणे परत आणण्यासाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल केंद्राच्या संपर्कात आहेत.
मध्य प्रदेशचे गृहसचिव गौरव राजपूत यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या 87 विद्यार्थ्यांच्या पालकांनी मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनशी संपर्क साधला आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या गोव्यातील रहिवाशांची संख्या त्वरित उपलब्ध नसताना, राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्राला पत्र लिहून त्यांच्या सुरक्षित परतीसाठी मदत मागितली आहे.
राजस्थानमधील सुमारे 600 ते 800 विद्यार्थी आणि हिमाचल प्रदेशातील सुमारे 130 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर राज्यातून लोकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे सांगितले आहे. त्याच वेळी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, राज्यातील सुमारे 2,000 रहिवासी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील सुमारे 85 रहिवासी युक्रेनमध्ये अडकले आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी जयशंकर यांना पत्र लिहून केंद्र सरकारला युक्रेनमध्ये अडकलेल्या पंजाबमधील रहिवाशांसह भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. कर्नाटक सरकारने सांगितले की राज्यातील 346 रहिवासी युक्रेनमध्ये अडकले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना पत्र लिहून अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सुविधा करुन त्यांची आवश्यक ती व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी तेलंगणा सरकारने केंद्राला विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे आवाहन केले. राज्यात आमण्यासाठीचा संपूर्ण प्रवास खर्च राज्य सरकार उचलण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. युक्रेनमध्ये हजारो मल्याळी लोक अडकले आहेत. याबाबत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही डी साठेशन यांनी परराष्ट्र मंत्र्यांना स्वतंत्र पत्रे लिहून विद्यार्थ्यांना, नगरिकांना सुरक्षीत परत आणण्याची विनंती केली आहे.
आंध्र प्रदेशातील सुमारे 170 रहिवासी आणि पुद्दुचेरीचे आठ रहिवासी देखील युक्रेनमध्ये अडकले आहेत. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे. तर ओडिसातील सुमारे 1 हजार 500 विद्यार्थी देखील युक्रेनमध्ये अडकले आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांना सुरक्षीत परत आणण्याची विनंती केली आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग म्हणाले की, संकटग्रस्त देशात अडकलेल्या राज्यातील 20 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी त्यांचे सरकार केंद्राशी समन्वय साधत आहे.
देशातील अनेक राज्यांतील मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. अनेक राज्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून विद्यार्थी आणि नगरिकांची तेथून सुटका करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, सरकार देखील त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स, पुतिन यांच्याकडून भारतीयांच्या सुरक्षेचे आश्वासन
- Russia Ukraine War : ...म्हणून भारतीय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला जातात; सध्या 'या' समस्यांचा करतायत सामना