मुंबई : डॉलरच्या तुलनेत घरंगळत निघालेल्या रुपयाने निचांकी स्तर गाठला आहे. एका रुपयाची किंमत डॉलरच्या तब्बल 70 रुपयांपर्यंत घसरली आहे. रुपयाचं इतिहासातलं हे सर्वात मोठं अवमूल्यन आहे.
मागच्या 4 वर्षात मंदावलेली निर्यात आणि चलन फुगवटा यामागची प्रमुख कारणं असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया मजबूत करायचा असल्यास, सरकारनं निर्यातीवर भर द्यावा, असं तज्ज्ञांचं मत आहे.
दरम्यान, रुपयाची सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 69.93 इतकं घसरलं होतं. आज 69.84 रुपयांवरुन बाजार सुरु झाल्यानंतर रुपया डॉलरच्या तुलनेत 70.08 इतका घसरला.
विरोधकांचं मोदी सरकारवर टीकास्त्र
दरम्यान, रुपयाच्या अवमूल्यावरुन काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने अखेर करुन दाखवलं, जे 70 वर्षात कधी झालंच नव्हतं, असं ट्विट काँग्रेसने केलं.
तिकडे आम आदमी पार्टीनेही ट्विटरवरुन मोदींवर निशाणा साधला. “जनता झेल रही है मार, रुपया पहुंचा 70 के पार, अब तो जागो मोदी सरकार”, असं ट्विट आपने केलं आहे.
तुर्कीचं चलन लीराने रुपया ढेपाळला
तुर्कीचं चलन लीराचं मूल्यही प्रचंड घसरलं आहे. त्याचा फटका विकसनशील देशांना बसला. लीराचं मूल्य घसरल्याने डॉलर आणखी मजबूत होत आहे. त्यामुळे अन्य चलनं तुलनेनं घसरत आहेत. त्यामध्ये भारताचा समावेश आहे. म्हणजे डॉलर मजबूत होत असल्याने रुपयाची घसरगुंडी सुरु आहे.
तुर्कीवर आर्थिक संकट
सध्या तुर्कीवर आर्थिक संकटाचे ढग आहेत. गेल्या 4 वर्षांपासून तुर्कीची अर्थव्यवस्था कठीण काळातून जात आहे. विकासाच्याबाबतीत एकेकाळी चीन आणि भारताच्या पंगतीत असणारा तुर्की आज पिछाडीवर गेला आहे.
व्यापारातील घट आणि वाढतंकर्ज त्यामुळे तुर्कीसमोरील संकटं वाढत आहेत. परिणामी महागाई वाढत आहे. त्यामुळे तुर्कीचं चलन लिरा हे डॉलरच्या तुलनेत घसरतच आहे.