नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हे दलितविरोधी होते, दलितांना हक्क मिळू नयेत यासाठी त्यांनी संसदेत मोठमोठी भाषणंही केली आहेत. हे सगळं रेकॉर्डवर आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
मंडल कमिशनच्या विरोधातील राजीव गांधींचं भाषण आजही उपलब्ध असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभर दलितांवर होत असलेले अन्याय, अत्याचार आणि अॅट्रॉसिटी कायद्यावरुन सुरु झालेली चर्चा यामुळे भाजप अडचणीत आली होती. त्याला मोदींनी 'जागरण' या वृत्तपत्राच्या मुलाखतीतून उत्तर दिलं आहे.
भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे, जो दलितांच्या उद्धारासाठी कटिबद्ध आहे, असा दावा मोदींनी केला आहे. शिवाय मोदींनी येत्या तीन राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचंही भाकीत केलं आहे.
काँग्रेस आणि तिसऱ्या आघाडीने 1997मध्ये बढतीमधील आरक्षण रद्द केलं होतं. अटल बिहारी वायपेयी यांच्या सरकारने एससी, एसटी समाजाला न्याय दिला होता. गेल्या काही दिवसांपासून मॉब लिंचिंग, एससी-एसटी कायद्यातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय याबाबत राजकारण सुरु असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.
लोकसभा- 2019 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी महाआघाडी तयार केली जात आहे, त्याची रुपरेखाही अशा पद्धतीने आखली जात आहे, जेणेकरुन भाजपला एससी-एसटी समुदायाचे मत मिळू नये, असा आरोप मोदींनी केला आहे. तसेच जेव्हा निवडणूक येते त्याचवेळी या पक्षांना या समुदायाची आठवण येते असंही मोदी म्हणाले. भाजपबद्दल चुकीचा प्रचार केला जातो. पण जनतेला हे माहिती आहे, की भाजप केवळ त्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे, असंही मोदी म्हणाले.
निवडणुका आल्या की ही भाजपसाठी लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जातं. मात्र भाजपने निवडणुका जिंकल्या की त्याचं यश नीट मोजलं जात नाही. सत्य हे आहे की विरोधकांनी कुठल्याही निवडणुकीत किमान आम्हाला आव्हान जरी देण्याची ताकद दाखवली तरी ते त्यांचं नैतिक यश असेल, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आधीच काँग्रेसनं आपली हार मान्य केली आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवण्यापासून ते दूर पळत आहेत. तिन्ही राज्यात आमच्याकडे लोकप्रिय मुख्यमंत्री आहे. या राज्यातील भाजपची कामगिरी पाहता येथे जनता पुन्हा एकदा भाजपला संधी देईल, असं मोदी म्हणाले.