त्रिपुरा विधानसभेत भागमभाग, आमदाराने अध्यक्षांचा राजदंड पळवला!
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2016 12:00 PM (IST)
अगरतळा : त्रिपुरा विधानसभेत आज प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते सुदीप रॉय बर्मन यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड घेऊन सदनाबाहेर पळ काढला. आमदार सुदीप रॉय बर्मन विधानसभाध्यक्ष रमेंद्र चंद्र देबनाथ यांच्या टेबलजवळ गेले आणि तिथला राजदंड पळवला. सदनाच्या मार्शल्सनी पकडण्याआधीच सुदीप रॉय सभागृहाबाहेर गेले होते. नेमका गोंधळ कशावरुन? त्रिपुराचे वन आणि ग्रामीण विकासमंत्री नरेश जमातिया यांच्यावर सेक्स स्कॅण्डलशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. यावर आमदार सुदीप बर्मन यांनी चर्चेची मागणी केली होती. परंतु विधानसभा अध्यक्षांनी चर्चा करण्यास नकार दिल्याने सुदीप बर्मन त्याचा विरोध करत होते. नरेश जमातिया आणि अगरतळा नगरपरिषदेचे नगरसेवक मृतमन सेन यांच्यावर सात वर्षांच्या मुलीशी छेडछेड केल्याचा आरोप होता. यानंतर मृतमन सेन यांना पोलिसांनी अटकही केली होती. पण त्यानंतर जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, त्रिपुरा विधानसभेत असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी पाच वेळा त्रिपुरा विधानसभा अध्यक्षांनी त्यांचं अधिकार चिन्ह गमावलं होतं. https://twitter.com/ANI_news/status/811082420296421376