जौनपूर (उत्तर प्रदेश) : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या विद्यमान राजकारणातील दोन विरोधी टोक. रोज वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन दोघांचीही एकमेकांविरोधात आगपाखड सुरु असते. मात्र, उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये राहुल गांधी यांनी राजकीय सुसंस्कृतपणाचं दर्शन घडवलं.

जौनपूरमध्ये जनआक्रोश रॅली

जौनपूरमध्ये सोमवारी काँग्रेसकडून ‘जनआक्रोश रॅली’चं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं भाषण झालं.

मोदी मुर्दाबाद म्हणणाऱ्यांना राहुल गांधींनी खडसावलं!

राहुल गांधी भाषणासाठी माईकजवळ आले, त्यावेळी समोर बसलेल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मोदी मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी राहुल गांधींनी कार्यकर्त्यांना खडसावलं आणि पंतप्रधानांना ‘मुर्दाबाद’ म्हणू नये, असे सांगितले.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

‘मोदी मुर्दाबाद’च्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून राहुल गांधी म्हणाले, “ही काँग्रेस पक्षाची सभा आहे आणि ‘मुर्दाबाद’ शब्दाचा प्रयोग इथे व्हायला नको. मोदी आणि भाजपसोबत आपले वैचारिक मतभेद आहेत. नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. आपली लढाई राजकीय आहे आणि राजकारणाच्या माध्यमातूनच त्यांना आपण पराभूत करु”

राजकीय मुद्द्यांवरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनी राजकीय सुसंस्कृतपणाही जोपासला आहे, हेच पुन्हा एकदा दिसून आलं आणि त्यांच्या या राजकीय सुसंस्कृतपणाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राजकारणात वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याकडून नक्कीच शिकण्यासारखं आहे.