नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप यूझरने अकाऊण्ट डिलीट केल्यास डेटाचं काय होतं, असा सवाल दिल्ली हायकोर्टाने 'व्हॉट्सअॅप'ला विचारला आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार कोणतीही माहिती आणि मेसेज सार्वजनिक होत नसल्याची हमी यापूर्वीच दिली आहे.


'व्हॉट्सअॅप वापरणं सुरु ठेवणाऱ्या यूझर्सशी आम्हाला देणंघेणं नाही, मात्र ज्यांना आपली माहिती शेअर करायची नाही, त्यांचं काय? एखाद्या व्हॉट्सअॅप यूझरने त्याचं अकाऊण्ट डिलीट केलं, त्याच्या तर जुन्या माहिती आणि डेटाचं काय होतं?' असा प्रश्न दिल्ली हायकोर्टाने विचारला आहे.

व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार यूझरची माहिती फेसबुकसोबत शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला जातो. याविरोधात कर्मण्या सिंग सरीन आणि श्रेया सेठी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान खंडपीठाने हा सवाल व्हॉट्सअॅपला विचारला.

व्हॉट्सअॅप डिलीट केल्यावर माहितीचं काय ?

'एखाद्या व्हॉट्सअॅप यूझरने आपलं अकाऊण्ट डिलीट केल्यास सोबतच सर्व माहितीही डिलीट होते' असा दावा कंपनीने प्रतिज्ञापत्रात केल्याचं वकिलांनी सांगितलं. मात्र यूझरचे प्रसिद्ध फोटो आणि व्हिडिओज सर्व्हरवर दीर्घकाळापर्यंत राहतात, असं म्हटलं आहे.

टेलिफोन नंबर सारखी माहिती फक्त फेसबुकसोबत शेअर होते, कोणताही डेटा शेअर होत नाही, असं व्हॉट्सअॅपतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.