आरएसएसकडून 10 लाख फूल पँट्सची ऑर्डर
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 05:52 AM (IST)
जयपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राजस्थानमधील टेक्स्टाईल सिटी भिलवाडा येथील 8 कंपन्यांना 10 लाख फूल पँट शिवण्याची ऑर्डर दिली आहे. संघाचा गणवेश खाकी विजार ऐवजी फूल पँट असेल, असा निर्णय आरएसएसच्या मार्चमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. भिलवाडा शहरातील 8 कंपन्यांना संघाच्या नवीन पँट तयार करण्यासाठी 10 लाख मीटर कापड देण्यात आलं आहे. तर चित्तोडगड जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये कापडांची प्रोसेसिंग चालू आहे. चित्तोडगडचे स्वयंसेवक आणि टेलर जयप्रकाश सिंग यांना 10 हजार पँट शिवण्याची ऑर्डर मिळाली आहे. पँटच्या शिवणकामाचं स्वरुप अजून ठरलेलं नाही, मात्र एका पँटची किंमक 200 ते 300 रुपये असेल, असं जयप्रकाश यांनी सांगितलं. जयप्रकाश हे यापूर्वी दरवर्षी संघाच्या 50 हजार खाकी विजार, काळी टोपी आणि शर्ट शिवण्याचे काम करत, असं जयप्रकाश यांनी सांगितलं. भिलवाडा येथील ज्या कंपन्यांना 10 लाख पँट शिवण्याचं काम देण्यात आलं आहे, त्या सर्व कंपन्या संघ विचार धारेच्या असल्याचीही माहिती आहे.