नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निशाण्यावर आहेत. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता राहुल गांधींना आपल्या कार्यक्रमाला आमंत्रण देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनीही संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.


दिल्लीतील विज्ञान भवनात 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. 'भारताचं भविष्य : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन' या विषयावर मोहन भागवत बोलणार आहेत. याच कार्यक्रमासाठी राहुल गांधींना आमंत्रण देणार असल्याचं कळतं.

राहुल गांधी यांच्याशिवाय माकप नेते सिताराम येचुरी यांनाही संघ आंमत्रण देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आमंत्रण मिळाल्यास राहुल गांधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबाबत उत्सुकता लागली आहे.

एकीकडे राहुल गांधींनी आरएसएसची तुलना मुस्लीम ब्रदरहूडशी केल्याने वाद सुरु असतानाच, दुसरीकडे संघाच्या कार्यक्रमाला त्यांना आमंत्रण देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याआधी नागपुरातील रेशीमबाग इथल्या संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला प्रणव मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावर त्यांच्या मुलीसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी टीका केली होती. मात्र तरीही प्रणव मुखर्जींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

आता खुद्द काँग्रेस अध्यक्षांनाच आरएसएस निमंत्रण देणार असल्याची चर्चा असताना, राहुल गांधी कार्यक्रमाला उपस्थिती लावणार का याची उत्सुकता आहे.

कधीकाळी संघाच्या कार्यक्रमात 'यांची'ही हजेरी

  • महात्मा गांधींनी 1934 साली वर्ध्यातील संघ शिबिराला भेट दिली होती.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही 1939 साली पुण्यातील संघशिक्षा वर्गाला भेट दिली होती.

  • महात्मा गांधींनी पुन्हा एकदा 1947 साली संघ स्वयंसेवकांसमोर भाषणही केलं होतं.

  • जयप्रकाश नारायण यांनीही 1977 साली संघशिक्षा वर्गासमोर भाषण केलं होतं.

  • माजी राष्ट्रपती डॉ झाकिर हुसेन यांनीही संघ संमेलनात हजेरी लावली होती.

  • माजी सेनादल प्रमुख के एम करिअप्पा यांनीही संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं होतं.

  • 2014 साली श्री श्री रविशंकर यांनी संखाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.