नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे देशाचे नवे संरक्षणमंत्री होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शाह यांनी गुजरातमधून राज्यसभेसाठी अर्ज भरला असून केंद्रीय मंत्रिपदाचा त्यांचा मार्ग सुकर करण्यासाठीच पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातं. अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्रीपद किंवा संरक्षणमंत्रिपद देण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अनुकूल असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


अमित शाह यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागावी, अशी आरएसएसचीच इच्छा असल्याची माहिती आहे. त्यांना गृह किंवा संरक्षण मंत्रालय द्यावं, ही देखील संघाचीच भूमिका आहे. मात्र आतापर्यंत संघाची इच्छा काहीही असली, नरेंद्र मोदी यांनी स्वतःचे निर्णय स्वतःच घेतले. त्यामुळे आता मोदींची अमित शाह यांच्या बाबतीत काय भूमिका असेल, याबाबत सस्पेंस मात्र कायम आहे.

मोदींना कॅबिनेटमध्ये काही वजाबाकी करावी लागणार आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्यात परतल्यानंतर अर्थमंत्री असलेल्या अरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. मात्र देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्री असावा, अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच सीमेवर वारंवार उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबतीत योग्य भूमिका घेण्यासाठी अमित शाह यांच्यासारखं नेतृत्व गरजेचं असल्याचं संघात बोललं जात आहे.

राज्यमंत्री अनिल दवे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या जागीही कुणाची तरी वर्णी लागणार आहे. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित केलेल्या व्यंकय्या नायडूंकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी स्मृती इराणींकडे देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाहांची वर्णी लागावी, अशी इच्छा संघातील काही कार्यकर्त्यांची आहे.

भाजपने केंद्रात सत्ता मिळवल्यानंतर, विविध राज्य देखील काबीज करण्यात अमित शाह यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. त्या कामगिरीचा मोबदला म्हणूनच अमित शाह यांच्या पदरात महत्त्वाचं कॅबिनेट खातं दिलं जाणार जाऊ शकतं. मात्र अमित शाह मंत्री बनल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यासाठी तेवढाच तुल्यबळ चेहरा भाजपला शोधावा लागणार आहे.