केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली विजयादशमीच्या दिवशी आरएसएसची स्थापना केली होती. तेव्हापासून दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी आरएसएसकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, संघाच्या दसरा मेळाव्यात शिव नाडर यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मेळाव्यादरम्यान केलेल्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं. या सरकारमध्ये साहसी आणि घाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. असं म्हणत त्यांनी मोदींचं कौतुक केले. त्याआधी त्यांनी स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध पथसंचलनालाही हजेरी लावली.
भागवत म्हणाले की, लोकशाहीची व्यवस्था भारताने पश्चिमेकडील देशांकडून घेतलेली नाही, तो भारताच्या परंपरेचा भाग आह. जम्मू- काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्याबद्दल भागवत म्हणाले की, खूप दिवसांनी असं वाटलं की, देशात काहीतरी बदलणार आहे. कारण पहिल्यांदाच साहसी आणि कठोर निर्णय घेण्याची धमक असलेलं सरकार या देशात आहे.
देशातल्या आर्थिक मंदीचाही मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले की, मंदीबाबत चर्चा करण्यापेक्षा चिंता करण्याची गरज आहे.
दरम्यान भागवत यांनी देशातल्या मॉब लिन्चिंगच्या घटनांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मॉब लिन्चिंगच्या घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही. आमचे स्वयंसेवक अशी कामं करत नाहीत. जर एखादा स्वयंसेवक अशा घटनेत आढळला, तर संघ त्याला प्रोटेक्ट करत नाही. अशा घटनांमध्ये संघाचं नाव घेऊन संघाला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु आहे.