नवी दिल्ली : राजस्थानमध्ये 1 एप्रिल रोजी गाय तस्करीच्या संशयातून जमावाकडून एकाची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशभरात गोहत्याबंदी लागू करावी, अशी मागणी केली आहे. तसेच यासाठी विशेष कायदा करण्याची गरज असल्याचं मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
दिल्लीत महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी तथाकथित गोरक्षकांचा चांगलाच समाचार घेतला. गाईच्या रक्षणासाठी सुरु असलेल्या हिंसाचारामुळे याला चुकीचं वळण मिळत आहे. त्यामुळे याचा निषेध केला पाहिजे. संघानं नेहमीच गोहत्याबंदीसाठी कायदा करण्याची मागणी केली. जेणेकरुन गाईंचं रक्षण कायद्याच्या चौकटीतचं केलं जाऊ शकेल.
मोहन भागवत म्हणाले की, ''गाईचं रक्षण करताना कोणीही हिंसाचाराचा मार्ग स्विकारु नये. पण सध्या गोरक्षेच्या कार्याला बदनाम करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे गाईंचं रक्षण कायद्याच्या चौकटीतच राहून झालं पाहिजे. त्यासाठी कायदा अस्तित्वात असणं गरजेचं आहे.''
विशेष म्हणजे, ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे, त्यांनी गोहत्या बंदीसाठी कायदा केला आहे. त्याचं इतरांनीही अनुकरण करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्या ईशान्य भारत आणि केरळ व पश्चिम बंगालमध्ये गोहत्याबंदी संदर्भात कायदा नसल्याचंही भागवतांनी यावेळी नमुद केलं.
काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या अलवरमध्ये 200 कथित गोरक्षकांनी गायींची वाहतूक करणाऱ्या 5 जणांना बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर विरोधी पक्षांनीही राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरलं होतं. राजस्थान सरकारनेही यावर कठोर कारवाई केली जाईल, असं अश्वासन दिलं आहे.
संबंधित बातम्या
राजस्थानमध्ये गाय तस्करीच्या संशयातून एकाची हत्या