नवी दिल्ली : शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी अक्षय कुमारच्या संकल्पनेतून नवं अॅप तयार करण्यात आलं आहे. 'भारत के वीर'  असं या वेब पोर्टलचं नाव असून, त्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते दिल्लीत झालं. या कार्यक्रमाला अक्षय कुमारची प्रमुख उपस्थिती होती.


या पोर्टलच्या माध्यमातून इच्छूकांना शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता येणार आहे. या पोर्टलसाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबियांना ही मदत पोहचवण्यात येणार आहे.

यावेळी उपक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे अक्षय कुमारने आभार मानले. याची संकल्पना तीन महिन्यांपूर्वी आपल्या मनात आल्याचं अक्षय कुमारनं यावेळी सांगितलं. तो म्हणाला की, ''मी दहशतवाद्यांचा एक माहितीपट पाहात होतो. त्यामध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षित करण्यापूर्वी त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांना सर्व मदत पोहचवली जाईल असं सांगितलं जातं. यानंतर लहान दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून ही मदत त्याच्या कुटुंबियांना पोहचवली जाते.''

''मग यालाच सकारात्मक जोड देऊन शहीदांच्या कुटुंबियांनाही मदत पोहचवता येईल, अशी कल्पना माझ्या मनात आली. याला केंद्र सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या अॅपच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य व्यक्तीलाही शहीदांच्या कुटुंबियांना मदत करता येणार आहे.'' असं अक्षय कुमार यावेळी म्हणाला.

अक्षय कुमारचं संपूर्ण भाषण पाहा