शिकागो : हिंदू बांधवांनी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी काम करायला हवं, असं आवाहन राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे. स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाला 125 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित केलेल्या विश्व हिंदू काँग्रेस संमेलनात भागवत बोलत होते. जवळपास अडीच हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.


हिंदू समाजात प्रतिभावान लोकांची कमी नाही, मात्र ते एकत्र येत नाहीत, असं मोहन भागवत म्हणाले. हिंदूंचं एकत्र येणं हे मोठं आव्हान आहे. हजारो वर्षांपासून हिंदू समाजावर अन्याय होत आहे. हिंदू समाज आपले मूळ सिद्धांत विसरला आहे. त्यामुळे हिंदू समाजाला एकत्र येणे सध्या गरजेचं आहे, असंही भागवत म्हणाले.


मोहन भागवत पुढे म्हणाले की, वाघ एकटा असेल तर जंगली कुत्रे त्याला घेरून त्याची शिकार करु शकतात. त्यामुळे हिंदूंनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे.  हिंदू एकत्र नाहीत याबाबत मोहन भागवत यांनी खंतही व्यक्त केली.


हिंदू कधी कोणाला विरोध करण्यासाठी जगत नाही. मात्र असे काही लोक आहेत जे हिंदूंना विरोध करतात. त्यामुळे अशा लोकांपासून आपल्याला (हिंदूंना) काही नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घेणे गरजेचं आहे, असं भागवत यांनी म्हटलं.