नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं दोन दिवसीय अधिवेशन उद्यापासून दिल्लीत सुरु होत आहे. अॅट्रोसिटी कायद्यावरुन सवर्णांमध्ये वाढत चाललेला रोष कसा हाताळायचा, दलित आणि सवर्ण या दोन्हींना कसं सोबत ठेवता येईल, यावर या अधिवेशनात प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.


8 आणि 9 सप्टेंबरला होणारी राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधीची शेवटची बैठक असू शकते. त्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान या राज्यांच्या निवडणुकीसह 2019 च्या रणनीतीवरही यावेळी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला जाऊ शकतो.

याशिवाय, या कार्यकारिणीसाठी जे स्थान भाजपने निवडलं आहे, त्यातूनही एक संकेतात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात ही बैठक होणार आहे. मागच्याच वर्षी बाबासाहेबांच्या नावाने उभ्या राहिलेल्या या दिमाखादार वास्तूचं पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलं होतं.

याआधी दिल्लीत जेव्हा भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक व्हायची, तेव्हा ती एनडीएमसीच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होत असे, पण यावेळी आंबेडकरांच्या नावाने उभ्या राहिलेल्या या वास्तूत ही बैठक होत आहे. ही बैठक ऑगस्ट महिन्यातच नियोजित होती, मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

अॅट्रोसिटी कायद्यावरुन कालच सवर्णांकडून भारत बंदचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय हरियाणात झालेल्या ब्राम्हण संमेलनात काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी आवर्जून हजेरी लावून भाजपच्या राज्यात ब्राम्हणांवर कसा अन्याय होतोय याचा पाढा वाचला होता. त्यामुळे दलितांसाठी काही करताना आपला पारंपरिक मतदारही कसा दुखावणार नाही याचं मंथन भाजपमध्ये सुरु झालं आहे.

अॅट्रोसिटी कायद्याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी सवर्णांशी संवाद साधण्याची रणनीतीही भाजपने आखली आहे. त्यामुळे या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यादृष्टीने आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे काय मुद्दे समोर येतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. या कार्यकारिणीसाठी उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते दिल्लीत उपस्थित असतील.